माजी आमदार गजेंद्र ऐनापुरे यांचे निधन
By Admin | Published: April 16, 2017 11:49 PM2017-04-16T23:49:48+5:302017-04-16T23:49:48+5:30
माजी आमदार गजेंद्र ऐनापुरे यांचे निधन
मिरज : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सचिव व माजी शिक्षक आमदार गजेंद्र लगमाण्णा ऐनापुरे (वय ७२) यांचे रविवारी सायंकाळी मिरजेत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. ऐनापुरे यांच्यावर उद्या सोमवारी मिरजेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
चिकोडी तालुक्यातील देसाई इंगळी येथील गजेंद्र ऐनापुरे यांनी स्वामी विवेकानंद संस्थेत डी. एड्. महाविद्यालयात शिक्षक म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली. नोकरी करीत पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्यांनी बी. एड्. महाविद्यालयावर प्राचार्य म्हणून काम केले. कऱ्हाड व तासगाव येथील बी.एड्. महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी सुमारे ३५ वर्षे सेवा केली. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर २००२ मध्ये पुणे शिक्षक मतदारसंघातून शिक्षक लोकशाही आघाडीतर्फे निवडणूक लढवून ते निवडून आले.
२००२ ते २००८ या कालावधित शिक्षकांचे अनेक प्रश्न त्यांनी विधीमंडळात मांडले. शिक्षण व्यवस्थेबाबत त्यांनी चार पुस्तके लिहिली आहेत. बी. एड्. कॉलेज संघटना व बी. एड्. प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. शिक्षक लोकशाही आघाडी या माध्यमिक शिक्षकांच्या संघटनेचे ते अध्यक्ष होते. शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘फिनिक्स’ हे पाक्षिक चालवित होते. मिरजेत डॅफोडील्स इंग्लिश स्कूलसह टिचर्स एज्युकेशन सोसायटी, स्वामी विवेकानंद ग्रंथालय सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ या संस्थांची त्यांनी स्थापना केली होती. शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी त्यांचा निकटचा संबंध होता. शिक्षण क्षेत्रासोबत अध्यात्माचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. आज मिरजेत एका शैक्षणिक कार्यक्रमास उपस्थित राहून घरी परतल्यानंतर सुंदरनगर येथील दुसऱ्या मजल्यावरील घराच्या पायऱ्या चढताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. घरात पोहोचल्यानंतर हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. गजेंद्र ऐनापुरे यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.
गजेंद्र ऐनापुरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, चार भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. सोमवारी मिरजेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (वार्ताहर)