कुपवाडकरांचा आधारवड अनंतात विलीन, माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

By हणमंत पाटील | Published: December 27, 2023 07:15 PM2023-12-27T19:15:16+5:302023-12-27T19:15:50+5:30

अंत्यदर्शन यात्रेसाठी महाराष्ट्र-कर्नाटकातून कार्यकर्त्यांची गर्दी

Former MLA Prof. Sharad Patil body was cremated with state honors | कुपवाडकरांचा आधारवड अनंतात विलीन, माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

कुपवाडकरांचा आधारवड अनंतात विलीन, माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

महालिंग सरगर 

कुपवाड : माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या निधनाने कुपवाडकरांचा आधारवड हरपला. बुधवारी सकाळी सर गेल्याचे कळताच राणाप्रताप चाैकातील त्यांच्या घरासमाेर माेठी गर्दी झाली. अंत्यदर्शनासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातून हजाराेंच्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले. दुपारी १ वाजता सजविलेल्या ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा काढून बुधगाव रस्त्यावरील स्मशानभूमीत पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

कुपवाडकरांची बुधवारची सकाळच प्रा. पाटील यांच्या निधनाच्या बातमीने उजाडली. शाेकाकुल कार्यकर्ते, नागरिक कुपवाड येथील निवासस्थानासमाेर अंत्यदर्शनासाठी जमू लागले. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, कर्नाटकचे माजी आमदार के. पी. मग्गेनवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पाटील यांचे सचिव ओमप्रकाश शेटे, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी नगरसेवक गजानन मगदूम, पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज पवार, समित कदम, महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) चे प्रभारी प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, जे. के. (बापू) जाधव, बजरंग पाटील, अप्पर तहसीलदार अर्चना पाटील, तहसीलदार अर्पणा मोरे-धुमाळ, कुपवाड अर्बन बँकेचे अवसायक डॉ. एस. एन. जाधव यांच्यासह मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले.

दुपारी राणाप्रताप चाैकातील प्रा. पाटील यांच्या निवासस्थानापासून सजविलेल्या ट्रॅक्टरमधून प्रा. पाटील यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. ‘शरद पाटील अमर रहे’ अशा जयघोषात हजाराेंचा जनसमुदाय अंत्ययात्रेत सहभागी झाला हाेता. रस्त्याच्या दुतर्फा नागरिक साश्रुनयनांनी अंत्यदर्शन घेत हाेते. अंत्ययात्रेत माजी महापौर सुरेश पाटील, संगीता खोत, माजी उपमहापौर मोहन जाधव, प्रशांत पाटील, माजी नगरसेवक शेडजी मोहिते, उद्योजक अण्णासाहेब उपाध्ये, प्रा. आर.एस.पाटील यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते. 

बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना..

अंत्ययात्रा बुधगाव रस्त्यावरील सार्वजनिक स्मशानभूमीत आल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. शासनाच्या वतीने प्रांताधिकारी उत्तम दिघे, अप्पर तहसीलदार अर्चना पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. प्रा. पाटील यांच्या मुली विनयश्री पाटील, वैशाली देवर्षी, सविता सरडे, सरोज रायनाडे, सुप्रिया आडमुठे, नातू प्रणव पाटील, वितराग देवर्षी यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला.

कुपवाड बंद

कुपवाड परिसरातील सर्व व्यापारी, दुकानदार, खोकीधारकांनी दिवसभर सर्व व्यवहार बंद ठेवले. शाळा व्यवस्थापनानेही बुधवारी सुटी जाहीर करून प्रा. पाटील यांच्या निधनाबद्दल दुखवटा व्यक्त केला.

Web Title: Former MLA Prof. Sharad Patil body was cremated with state honors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली