माजी आमदार संपतराव चव्हाण यांचे निधन
By Admin | Published: July 3, 2015 11:47 PM2015-07-03T23:47:37+5:302015-07-04T00:01:22+5:30
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते : नागराळेत उद्या अंत्यसंस्कार
दुधोंडी : सांगली जिल्ह्यातील तत्कालीन भिलवडी-वांगी (सध्याचा पलूस-कडेगाव) मतदारसंघाचे माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपतराव अण्णासाहेब चव्हाण (वय ७६) यांचे शुक्रवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांचे मूळ गाव नागराळे (ता. पलूस) आहे.
१९७८ मध्ये नव्याने स्थापन झालेल्या भिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघात चव्हाण यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. कम्युनिस्ट पक्षाचे जी. डी. बापू लाड यांचा पराभव करीत या मतदारसंघाचे ते पहिले आमदार झाले. त्यानंतर १९८० मध्ये चव्हाण यांनी काँग्रेसचे बंडखोर डॉ. पतंगराव कदम यांच्याशी संघर्ष करीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला. अत्यंत धडाडीचे व अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख होती. तत्कालीन तासगाव तालुक्यातील सहकारी, शैक्षणिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता.
१९८५ मध्ये डॉ. पतंगराव कदम यांच्याकडून पराभव झाल्यानंतर ते सक्रिय राजकारणापासून अलिप्त झाले. तरीही सामाजिक व पक्षकार्यात ते नेहमीच हिरीरीने भाग घेत. चव्हाण यांचे वडील अण्णासाहेब व काका विष्णू हे दोघेही पैलवान होते. त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले होते. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात जिल्हा परिषदेतून झाली. १९७२ मध्ये ते कुंडल जिल्हा परिषद गटातून निवडून आले होते. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा डॉ. पृथ्वीराज व संग्राम व मुलगी सुषमा असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव सांगलीतील भारती विद्यापीठात दर्शनासाठी ठेवले आहे. त्यांच्यावर रविवारी (दि. ५) नागराळे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (वार्ताहर)