माजी आमदार शि. द. पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:19 AM2019-12-16T00:19:30+5:302019-12-16T00:19:52+5:30

येलूर : माजी आमदार व शिक्षक नेते शिवाजीराव दत्तात्रय पाटील (वय ९0) यांचे रविवारी पहाटे कोल्हापूर येथे उपचार सुरू ...

Former MLA Sh. S Patil passed away | माजी आमदार शि. द. पाटील यांचे निधन

माजी आमदार शि. द. पाटील यांचे निधन

Next

येलूर : माजी आमदार व शिक्षक नेते शिवाजीराव दत्तात्रय पाटील (वय ९0) यांचे रविवारी पहाटे कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना निधन झाले. येलूर (ता. वाळवा) येथे त्यांच्या जन्मगावी अंत्ययात्रा काढून अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी येलूर येथे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
महाराष्टÑातील शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात शि. द. पाटील यांनी प्रदीर्घकाळ काम केले. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ ते अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे नेतृत्व करताना त्यांनी प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नावर मोठा लढा उभारला होता. शिक्षक नेते म्हणून त्यांनी केलेली कामगिरी जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकीय, शैक्षणिक पटलावर कोरली गेली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी पहाटे चारच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
येलूर येथे ३0 एप्रिल १९३0 रोजी शिवजयंतीला एका शेतकरी कुटुंबात शिवाजीराव पाटील यांचा जन्म झाला. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव शिवाजी ठेवले होते. सातवी पास झाल्यानंतर १९४८ ला प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक चिमणगाव (ता. कोरेगाव) या ठिकाणी झाली. येळगाव, येळावी, मिरज, आष्टा, येलूर, तांदुळवाडी याठिकाणी त्यांनी अध्यापनाचे काम पहिले. येलूर येथे १९८८ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.
या काळात अध्यापनाचे काम करीत असतानाच दहावीची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. या काळात शिक्षकांसमोर येणाऱ्या अडचणी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काही तरी केले पाहिजे, या जाणिवेने त्यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून काम सुरू केले. १९७५ ते १९९४ या कालावधित राज्याच्या शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. २00२ मध्ये अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. याच वर्षात म्हणजेच २२ एप्रिल २00२ रोजी विधानपरिषद सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. २0१0 पर्यंत ते विधानपरिषद सदस्य होते. सांगली जिल्हा प्राथमिक बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. फिलिपाईन्स येथे झालेल्या शिक्षण परिषदेत शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा सहभाग होता.
शि. द. पाटील यांची अंत्ययात्रा येलूर गावातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आली. जिल्ह्यासह राज्यातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. त्यांची मुले रामचंद्र, माधवराव व सुरेश यांनी पार्थिवाला भडाग्नि दिला.
शिक्षक नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, भगवानराव साळुंखे, सम्राट महाडिक, राजन महाडिक, सत्यजित देशमुख, पी. आर. पाटील, निजाम मुलाणी, राज्य शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब काळे, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी, विश्वनाथ मिरजकर, श्रीमंत काकडे, नायब पटेल, धनाजी माने यांच्यासह महाराष्ट्रातील असंख्य शिक्षक, राजकीय नेते यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
त्यांच्या पश्चात ३ मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवार दि. १७ डिसेंबरला होणार आहे.
शिक्षकांच्या प्रश्नांवर राज्यव्यापी कार्य
शिवाजीराव पाटील हे शि. द. पाटील या नावाने भारतातील शिक्षकांमध्ये परिचित होते. व्यायामाने कमावलेली भारदस्त शरीरयष्टी, प्रभावी वक्तृत्व आणि संघटनकौशल्याच्या जोरावर त्यांनी शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात आपली छाप पाडली. प्राथमिक शिक्षकांचे अनेक जटिल प्रश्न संघटनेच्या बळावर त्यांनी मार्गी लावले. दरवर्षी शिक्षकांचे अधिवेशन घेऊन लाखो शिक्षकांना ते एकत्रित करत. राज्यात व देशात विविध ठिकाणी त्यांनी संघाची मोठी अधिवेशने घेतली. आयुष्यातील ४६ वर्षे देशातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन, प्रशासन यांच्याशी त्यांनी संघर्ष केला. त्यांनी येलूर येथे श्री दत्त माध्यमिक विद्यालय व मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह सुरु केले. जत येथेही श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उभारले.

Web Title: Former MLA Sh. S Patil passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.