राजू शेट्टींची 'हुंकार यात्रा' उद्यापासून, भाजपच्या पेशवाईचा तर आघाडीच्या सरंजामशाहीच्या विरोधात एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 05:57 PM2022-04-15T17:57:33+5:302022-04-15T17:58:37+5:30
सर्वांविरुद्ध पुन्हा वज्रमूठ बांधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी १६ एप्रिलपासून ‘हुंकार बळिराजाचा’ यात्रा काढणार
इस्लामपूर : गेल्या आठ वर्षांत भाजपच्या पेशवाईचा तर महाविकास आघाडीच्या सरंजामशाहीचा अनुभव आला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे भले होणार नाही. या सर्वांविरुद्ध पुन्हा वज्रमूठ बांधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी १६ एप्रिलपासून ‘हुंकार बळिराजाचा’ यात्रा काढणार असल्याची माहिती राज्य प्रवक्ते ॲड. एस. यु. संदे यांनी येथे दिली.
ॲड. संदे म्हणाले, शनिवारी सायंकाळी सहा वाजता माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मगाव असलेल्या देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथून या यात्रेची सुरुवात होणार आहे. २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहास्तव शेट्टी यांनी भाजपसोबत आघाडीचा प्रस्ताव स्वीकारला. यावेळी शेतकऱ्यांचे हित साधणारी भूमिका घेण्याचे वचन अहमदाबाद येथील बैठकीत गुजरात भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. मात्र, त्यांच्याकडून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे निर्णय घेतले जात होते.
ते म्हणाले, २०१९ ला राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय करण्यासाठी सोबत या, अशी विनंती केली. त्यावेळी शेट्टी कॉँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहिले. या दोन्ही पक्षाचे आमदार, मंत्री निवडून आणण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वाटा आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत या ठरावावर शेट्टी हेच सूचक आहेत.
भाजपचाच कित्ता गिरवत शेतकऱ्यांचे नुकसान करणारे निर्णय होत असल्याने आणि निर्णय प्रक्रियेत सामील करून न घेतल्याने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि त्यांच्या हितासाठी ‘स्वाभिमानी’ची वाटचाल सुरू राहील.
यावेळी जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, जगन्नाथ भोसले, प्रभाकर पाटील, विलास पाटील, एकनाथ पाटील, प्रवीण पाटील, रमेश पाटील, टी. टी. सनगर उपस्थित होते.