सांगली रेल्वे स्थानकावरील पुलाचा प्रश्न रेल्वे मंत्र्यांच्या दरबारी, माजी रेल्वे मंत्र्यांकडून दखल
By अविनाश कोळी | Published: December 25, 2023 04:17 PM2023-12-25T16:17:49+5:302023-12-25T16:19:40+5:30
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे हा प्रश्न सोडविण्याची विनंती केली
सांगली : सांगलीरेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ व ५ वरील प्रवाशांसाठी तसेच मालधक्क्यापर्यंत पूल नसल्यामुळे प्रवासी, रेल्वे कर्मचारी व हमालांच्या गैरसोयीच्या प्रश्नावर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला होता. रेल्वे प्रवासी ग्रुपने या बातमीच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केल्यानंतर माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी त्याची दखल घेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे हा प्रश्न सोडविण्याची विनंती केली आहे.
सांगली स्थानकावर गतिशक्ती योजनेंतर्गत १२ कोटी रुपये खर्चून नवीन पूल बांधण्यात येणार आहे. पण हा पूल मालधक्क्याला जोडण्यात येणार नाही, असा खुलासा रेल्वे प्रशासनाने माहिती अधिकारांतर्गत पत्रव्यवहारात केला आहे. याच स्थानकावर प्रवासी गाड्यांसाठी बांधण्यात आलेल्या नवीन प्लॅटफाॅर्म क्र. ४ लाही पादचारी पूल मिळणार नाही, असेही प्रशासनाने म्हटले आहे. नवा पूल फक्त प्लॅटफाॅर्म क्रमांक १, २ व ३ लाच जोडला जाईल. त्यामुळे नव्या प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना प्लॅटफॉर्म पहिल्या तीन फलाटांवर येताच येणार नाही. त्यांना रूळ ओलांडावा लागेल.
सांगली स्थानकाच्या मालधक्क्यासाठी पादचारी पूल नसल्याने सध्या हमालांना रेल्वे रूळ ओलांडणे हाच पर्याय समोर उरतो. देशात सर्व स्थानकांवर प्लॅटफाॅर्म एकवरून मालधक्क्यापर्यंत पादचारी पूल आहेत. मात्र, सांगलीला नाही. याबाबत ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा दाखला देत रेल्वे प्रवासी ग्रुपने सोशल मीडियावर मध्य रेल्वे प्रशासनासमोर प्रश्न उपस्थित केला. माजी रेल्वे मंत्री प्रभू यांनी संघटनेचे हे ट्विट केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे फाॅरवर्ड केले व या प्रश्नाची सोडवणूक करण्याची विनंती केली. प्रवासी संघटनेने याबाबत प्रभू यांना धन्यवाद दिले. रेल्वेने हा प्रश्न साेडवला नाही, तर त्यासाठी आंदोलनाची तयारीही संघटनेने केली आहे.