इस्लामपुरातील मारहाण प्रकरण राजकीय भूमिकेच्या संशयातूनच, नगरपालिका निवडणुकीआधीच धुमशान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 12:54 PM2022-07-27T12:54:52+5:302022-07-27T12:55:39+5:30
अलीकडील दोन वर्षांत नगरसेविका शिंदे यांच्या राजकीय भूमिका संशयास्पद होत्या. त्यामुळे त्यांचे पती विजयकुमार शिंदे यांना मारहाण झाल्याची चर्चा
अशोक पाटील
इस्लामपूर : नगरपालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार आणि प्रतिभा शिंदे एकाच प्रभागातून विजयी झाले. यामागे पवार यांची मोठी ताकद होती. अलीकडील दोन वर्षांत नगरसेविका शिंदे यांच्या राजकीय भूमिका संशयास्पद होत्या. त्यामुळे त्यांचे पती विजयकुमार शिंदे यांना मारहाण झाल्याची चर्चा आहे. यातून शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात संघर्षाची ठिणगी पडली आहे.
विकास आघाडीत शिवसेनेचा स्वतंत्र गट होता. पालिकेत शिवसेनेचे पाच नगरसेवक होते. त्यात प्रतिभा शिंदे यांचा समावेश होता. त्यांना पालिकेत निवडून आणण्यासाठी जिल्हाप्रमुख पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. अलीकडे प्रतिभा शिंदे यांचा कल राष्ट्रवादीकडे झुकल्याचा संशय शिवसेनेला होता. शिवसेनेने इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर नामकरण करण्याची भूमिका घेतली होती. यासाठी लोकांच्या सह्यांची मोहीम राबविली. पालिकेत नामांतराचा ठराव संमत करण्यासाठी प्रयत्न केले. ज्या दिवशी हा ठराव सभागृहात ठेवण्यात आला, त्यावेळी प्रतिभा शिंदे गैरहजर राहिल्याचा रागही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना होता.
शिवसेनेतील बंडानंतर आनंदराव पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यावेळी पालिकेतील पाचही नगरसेवकांना मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी आमंत्रित केले होते; परंतु प्रतिभा शिंदे अनुपस्थित राहिल्या. याचाही राग काहींना होता. यातूनच ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. पालिका निवडणुकीआधीच धुमशान सुरू झाले आहे.
शिंदेंचा सर्वपक्षीय नेत्यांशी संपर्क
प्रतिभा शिंदे यांचे बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे संघटन आहे. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांचे पती विजयकुमार शिंदे बांधकाम व्यावसायिक आहेत. सर्वच पक्षांतील नेत्यांशी त्यांचा संपर्क आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर त्यांची ऊठ-बस शिवसेनेला रुचली नसल्याची चर्चा आहे.
प्रतिभा शिंदे यांच्या पाठीशी शिवसेना असतानाही त्यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. यासाठी काही अर्थपूर्ण व्यवहार केल्याची चर्चा आमच्या कानावर आली. मारहाणीचा तपास करून पोलीस करतीलच. यामध्ये काही राजकारण नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिभा शिंदे यांना छुपा पाठिंबा देऊन आम्हाला अडकविण्याची खेळी केली आहे. जयंत पाटील यांनी शहरातील शिवसेना संपविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. - आनंदराव पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना शिंदे गट