सांगलीच्या दुर्गप्रेमींनी सर केले कळसूबाई शिखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:25 AM2021-03-26T04:25:01+5:302021-03-26T04:25:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सह्याद्री पर्वत रांगांमधील महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर असणारे कळसूबाई शिखर सर करण्याची कामगिरी सांगलीतील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सह्याद्री पर्वत रांगांमधील महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर असणारे कळसूबाई शिखर सर करण्याची कामगिरी सांगलीतील सह्याद्री व्हेंचर्सच्या दुर्गप्रेमींनी केली. मोहीम फत्ते झाल्यानंतर या दुर्गप्रेमींनी एकच जल्लोष केला.
कळसूबाई शिखराला महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणूनही ओळखले जाते. समुद्रसपाटीपासून ५४०० फूट (१६४६ मीटर) उंच असणारे हे शिखर सर करणे हे प्रत्येक ट्रेकरचे स्वप्न असते.
नुकतेच सांगलीतील सह्याद्री व्हेंचर्स या निसर्ग व दुर्गप्रेमी ग्रुपने कळसूबाई शिखर सर केले. सचिन बावचकर, डॉ. कल्याणी जगदाळे बावचकर, संदीप बावचकर, रोहन गावडे यांनी दुर्गभ्रमंतीसाठी सुरू केलेल्या सह्याद्री व्हेंचर्सने आजपर्यंत अनेक गड किल्ले सर केले आहेत. यातील ही त्यांची महत्त्वाची मोहीम होती.
सह्याद्री व्हेंचर्सच्या ३५ ट्रेकर्सच्या टीमने यात सहभाग घेतला होता. सचिन बावचकर यांनी सांगितले की, सुरुवातीपासून शिखरावर पोहोचेपर्यंत संपूर्ण चढण, थोडीफार निसरडी पायवाट, आडवे असणारे लहान- मोठे दगडगोटे व मध्येच कातळावर येणारा खडा लोखंडी जिना. यावरून चालताना मागे वळून पाहिले की काळजाला धडकीच भरते. सारे काही रोमांचित करणारे होते. काळाकुट्ट अंधार, त्यातच अंगाला झोंबणारी थंडी, असे विलक्षण वातावरण होते. सतत तीन तास पायपीट करून शिखरावर पोहोचल्याचा आनंद खूप मोठा होता.
भंडारदऱ्याचा जलाशय, रतनगड, आजोबा डोंगर, हरिश्चंद्रगड, अलंग मदन कुलंग असा इगतपुरीतील सर्व परिसर शिखरावरून न्याहाळता येतो. हा सर्व अनुभव दुर्गप्रेमींनी घेतला.