जिद्द व आवडीच्या जोरावर जगवली चाळीस झाडे
By admin | Published: May 7, 2017 11:50 PM2017-05-07T23:50:16+5:302017-05-07T23:50:16+5:30
जिद्द व आवडीच्या जोरावर जगवली चाळीस झाडे
पांडुरंग भिलारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाई : सहा वर्षांपूर्वी परखंदी हायस्कूल हे गावाच्या चावडीवर मंदिरात व परिसरातील खोल्यांमध्ये भरायचे, त्या परिसरात वृक्षारोपणासाठी जागा उपलब्ध नव्हती़ त्या कालखंडात विद्यार्थ्यांना दरवर्षी वृक्ष दत्तक स्वरुपात घरी लावण्यास देत असे व त्यांचे संवर्धन विद्यार्थ्यांमार्फत करून घेत असे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला़ आत्तापर्यंत विद्यार्थ्यांच्या घराच्या व शेतीच्या परिसरात शेकडो झाडे डौलात जिवंत आहेत़
यानतंर संस्था व्यवस्थापनाने विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी गावालगत मंदिर परिसरात प्रशस्त जागा उपलब्ध करून दिल्याने खऱ्या अर्थाने वृक्षारोपणासाठी प्रशस्त जागा उपलब्ध झाली़ नवीन जागेत विद्यालयाची आकर्षक इमारत उभी राहिली़ मग शाळेच्या परिसरात आम्ही वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आणि मग नियोजनबद्ध वृक्षारोपण करण्यास सुरुवात झाली. गेल्या सहा वर्षांपासून आम्ही विद्यार्थ्यांना दत्तक स्वरुपात वृक्षवाटप बरोबरच विद्यालयाच्या परिसरात आंबा, चिक्कू, वड, गुलमोहोर, नारळ, बदाम, सीताफळ, आवळा, लिंब आदी प्रकारची चाळीस झाडे लावली आहेत़
वृक्षदत्तक व परिसरात लावण्यासाठी वाई येथील सुयश प्रतिष्ठाननेही अनेकदा झाडे उपलब्ध करून दिल्याने मोलाचे सहकार्य लाभले़ झाडांच्या रोपणाबरोबरच संवर्धनाला आम्ही खूप महत्त्व देतो़ यासाठी आम्ही बहुतांश झाडांना लोखंडी जाळ्या बसविल्या आहेत़ झाडांना शेणखताचा डोसही पावसाळा सुरू होण्यापूर्वी दिला जातो़ त्यांना ठिबक केले आहे़ विद्यालय परिसरातील झाडे विद्यार्थ्यांना दत्तक स्वरुपात दिली आहेत़ त्यांना पाणी घालण्याचे व संरक्षणाची जबाबदारी दिली आहे.
ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून सर्व झाडांना ठिबकची सोयही करण्यात आली आहे़ तसेच विद्यार्थ्यांना शेतीतील ज्ञान मिळावे म्हणून शाळेच्या परिसरात कांदा, लसूण, वांगी आदी पिकांचे वाफे केले आहेत़ याची ही देखभाल विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते़ वृक्षसंवर्धनसाठी विद्यालयाचे शिक्षक पोपट जाधव, विजय भोईटे, शरद गायकवाड, प्रतिभा भांडवलकर, उमेश शिंदे, सेवक महेश महांगडे, रेखा गायकवाड आदी परिश्रम घेतात.