सहा महिने कोरोनाशी लढा दिला, आता वाऱ्यावर सोडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:34 AM2020-12-30T04:34:41+5:302020-12-30T04:34:41+5:30
सांगली : जिल्ह्यात ऑगस्टनंतर कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली, तशी आरोग्य विभागासाठी कंत्राटी स्वरुपात भरती सुरु झाली. सुमारे ...
सांगली : जिल्ह्यात ऑगस्टनंतर कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली, तशी आरोग्य विभागासाठी कंत्राटी स्वरुपात भरती सुरु झाली. सुमारे ४०० कर्मचाऱ्यांची भरती झाली. आता कोरोना संपताच त्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. शासकीय कामाचा आणि आरोग्य विभागाचा प्रशासकीय अनुभव असल्याने शासनाने कायमस्वरुपी नोकरीत घेण्याची मागणी कर्मचारी करू लागले आहेत.
भऱती करतेवेळी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांच्या कामाची हमी शासनाने दिली होती. कोरोना वाढलाच, तर सेवा कालावधी वाढविण्याची तरतूद होती. पण साथ नियंत्रणात येत असल्याचे पाहून तीन महिन्यांनी सेवा समाप्तीच्या नोटिसा आल्या. याविरोधात राज्यभरात नापसंती व्यक्त झाली. काही शहरांत रुग्णसंख्याही मोठी होती. त्यामुळे निर्णय मागे घेऊन पुन्हा तीन महिने मुदतवाढ मिळाली ती ३१ डिसेंबरला संपत आहे.
सहा महिन्यांच्या कालावधित तरुणांना भरभक्कम वेतन तथा मानधन मिळाले. कोरोना काळात हजारोंचा रोजगार हिरावला असताना या तरुणांचा मात्र चरितार्थ सुुरु राहिला. आता नोकऱ्या गमावण्याच्या भीतीने ते अस्वस्थ आहेत. सहा महिन्यांचा शासकीय कामाचा व आरोग्य विभागाचा अनुभव असल्याने सरकारी नोकरीत कायमस्वरुपीसामावून घेण्याची त्यांची मागणी आहे. आरोग्य विभागात नोकरभरती सुरु होईल, त्यावेळी आम्हालाच प्राधान्य मिळावे, अशीही भूमिका आहे.
प्रशासनाने हा दावा खोडून काढताना नेमणुका देतानाच तात्पुरत्या नोकऱ्यांचा करारनामा केल्याचे स्पष्ट केले. भविष्यात यदाकदाचित कोरोनाची दुसरी लाट आलीच, तर शासन स्तरावर त्यांचा पुन्हा विचार होऊ शकतो, असा दिलासाही दिला. सांगली-मिरजेतील खासगी रुग्णालयातील अनेक परिचारिकांना कंत्राटी भरतीमुळे चांगले पगार मिळाले. या २९७ परिचारिकांना पुन्हा आपल्या मूळ कामांवर परतावे लागणार असल्याने त्यांच्यात अस्वस्थता असल्याचे दिसून आले.
४१६ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला कोरोनाशी लढा
कोरोना काळात जिल्हाभरात खासगी व सरकारी मिळून एकूण ५८ कोविड सेंटर्स सुरू झाली. त्यापैकी शासकीय सेंटर्समध्ये ४१६ कर्मचाऱ्यांची भरती केली गेली. त्यामध्ये सहा फिजिशियन, ७ एमबीबीएस डॉक्टर्स, २९ बीएएमएस डॉक्टर्स, २९७ स्टाफनर्स, ३ एक्सरे टेक्निशियन, २ इसीजी टेक्निशियन, १० प्रयोगशाळा तंत्रज्ञ, २२ फार्मासिस्ट व ४० डाटा एन्ट्री ऑपरेटर्सचा समावेश होता. या साऱ्यांना ३१ डिसेंबरपासून काऱ्यमुक्त केले जाईल.
पदवीधरांना मिळाला तात्पुरता रोजगार
कोरोना व लॉकडाऊनमुळे मुंबई-पुण्यासह विविध ठिकाणचे तरुण आपापल्या गावी परतले. सात-आठ महिने रोजगाराचा प्रश्न होता, पण आरोग्य विभागातील कंत्राटी नियुक्त्या मिळाल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला. लॉकडाऊन शिथिल होताच ते आपापल्या मूळ कामांवर रुजू होणार आहेत. त्यांच्यासाठी कोविड इष्टापत्तीच ठरली.
जोखमीच्या काळात आम्ही काम केले. भविष्यातही अशा संकटांना तोंड देण्यासाठी सक्षम असल्याचे दाखवून दिले. आता शासनाने नोकर भरतीमध्ये आम्हाला प्राधान्य दिले पाहिजे. किंबहुना कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करायला हवे.
- असिफ जमादार,
कंत्राटी कर्मचारी
गेल्या सहा महिन्यांत आम्ही पूर्ण क्षमतेने सेवा दिली. या कालावधित सरकारी कामकाज पद्धतीचा अनुभव घेतला. कायम कर्मचाऱ्यांच्या तोडीस तोड काम करू शकतो हे दाखवून दिले. त्यामुळे शासनाने कायम नियुक्तीसाठी आमचा विचार करावा.
- नयन गाडेकर कंत्राटी कर्मचारीकंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरीत कायम करायला हवे
रिक्त जागांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या तातडीने नियुक्त्या कराव्यात.
रिक्त जागांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या तातडीने नियुक्त्या कराव्यात.
आरोग्यची भरती करताना कंत्राटी व अनुभवी कर्मचाऱ्यांना प्राधान्य मिळायला हवे.
-------------