कवठेमहांकाळ नगराध्यक्षपदासाठी अपक्ष नगरसेवकाचे मत निर्णायक ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 03:32 PM2022-10-20T15:32:44+5:302022-10-20T15:35:20+5:30
नगराध्यक्ष पदासाठी मतदान झाल्यास अंतर्गत गटबाजी उफाळून येणार काय? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
शिरढोण : कवठेमहांकाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाच्या हालचाली वेगळ्या स्वरूपात जात असल्याची चर्चा सुरू आहे. अश्विनी पाटील यांनी ठरलेल्या कालावधीत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लागली आहे. नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चार अर्ज दाखल झाले.
यामध्ये राष्ट्रवादीमधून दोन तर शेतकरी विकास आघाडीकडून दोन अर्ज दाखल केले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी मतदान झाल्यास अंतर्गत गटबाजी उफाळून येणार काय? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. यामुळेच चुरस निर्माण झाली असताना अपक्ष नगरसेवक रणजीत घाडगे यांची भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे. त्याचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शहरातील जनतेचे नगराध्यक्ष निवडीकडे लक्ष लागून राहिले आहे. नगरपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता स्थापन केली होती. नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे दहा तर शेतकरी विकास आघाडीचे सहा तर एक अपक्ष असे पक्षीय बलाबल सध्या आहे. मात्र राष्ट्रवादीमधूनच अशोकराव जाधव यांच्या गटाचे नलिनी भोसले यांनी अर्ज दाखल केल्याने नगराध्यक्ष निवडीत चुरस निर्माण झाली आहे. सध्या नगराध्यक्ष निवडीसाठी सर्वच नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस (दि. २०) रोजी निवडीचे चित्र स्पष्ट होणार आहे.