खटावमधील राष्ट्रवादी नेत्याच्या खूनप्रकरणी चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 02:58 PM2020-02-10T14:58:20+5:302020-02-10T14:59:30+5:30
खटाव (ता. पलूस) येथील राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांच्या खूनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. पूर्ववैमनस्यातून दहा लाखांची सुपारी देऊन हा खून करण्यात आल्याची प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
सांगली : खटाव (ता. पलूस) येथील राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांच्या खूनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. पूर्ववैमनस्यातून दहा लाखांची सुपारी देऊन हा खून करण्यात आल्याची प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
दत्तात्रय रामदास जाधव (वय ३३, रा. निरा ता. बारामती जि. पुणे), अतुल रमेश जाधव (वय २२, रा. बावडा ता. खंडाळा जि. सातारा), लक्ष्मण बाबुराव मडिवाल (वय ६०) व अरविंद शंकर पाटील (वय ६५, दोघेही रा. खटाव ता. पलूस) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे नेते व खटावचे माजी सरपंच आनंदराव धोंडीराम पाटील यांचा धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीयसहाय्यक गजानन पाटील यांचे ते बंधू असल्याने व राजकीय क्षेत्रातही कार्यरत असल्याने खळबळ उडाली होती.
भिलवडी पोलिसासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक याचा तपास करत होते. तपासाअंती हा खून पूर्ववैमनस्यातून रेकॉर्डवरील गुन्हेगार दत्तात्रय जाधव व त्याच्या साथीदाराने सुपारी घेऊन केल्याचे निष्पन्न झाले.
खटाव येथील लक्ष्मण मडिवाल व आनंदराव पाटील यांच्यात राजकीय कारणावरून वाद होता, तर अरविंद पाटील याची शेतजमीन आनंदराव पाटील यांनी विकत घेतल्याचाही त्यास राग होता. यातून दोघांनी मिळून दत्तात्रय जाधवला १० लाखांची सुपारी देवून हा खून केल्याचे चौकशीत समोर आले आहे. यावरून चौघांना अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सुनील हारूगडे, प्रवीण शिंदे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.