मोटार अडवून लुटणाऱ्या चौघांच्या टोळीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:33 AM2021-02-25T04:33:00+5:302021-02-25T04:33:00+5:30
सांगली : पुणदी (ता. पलूस) गावाकडे तुरची कारखाना ते तासगाव मार्गाने जात असताना, चारचाकी अडवून लुटणाऱ्या टोळीला स्थानिक ...
सांगली : पुणदी (ता. पलूस) गावाकडे तुरची कारखाना ते तासगाव मार्गाने जात असताना, चारचाकी अडवून लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. याप्रकरणी बालाजी निवास पाटील (२६, पुणदी, ता. तासगाव), राजेंद्र धनाजी चव्हाण (२७, रा. पिंपरी, ता. आटपाडी), धनंजय महेश साळुंखे (२४), कुणाल तानाजी ऐवळे (२१, दोघे रा. पर्वती, पुणे), शीतल विश्वनाथ जाधव (२७, रा. ढवळवेस, तासगाव) आणि श्रीकृष्ण अंकुश माळी (१९, वरचेगल्ली, तासगाव) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सोने, वाहनासह एक लाख ६१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणदी (ता. पलूस) येथील विशाल नारायण चव्हाण व त्यांचे मित्र नितीन बाबासाहेब पाटील हे ११ फेब्रुवारील पलूस येथील नातेवाईकांकडे जेवण करून रात्रीच्या सुमारास चारचाकीतून गावाकडे परत जात होते. साडेआठच्या सुमारास तुरची कारखाना ते तासगाव रस्त्यावर संशयित तिघे दुचाकीवरून तिथे आले व त्यांनी चारचाकीला गाडी आडवी मारत चव्हाण यास शिवीगाळ करून चाकूचा धाक दाखवला तर नितीन पाटील यांना मारहाण करून सोन्याची चेन व अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. संशयित चारचाकी विटाकडे घेऊन जाताना पाटील यांनी कारमधून उडी मारली. संशयित विटा मायणी रस्त्यावर चारचाकी सोडून पळून गेले होते.
लूटमार करणारे संशयित चोरीचा ऐवज विकण्यासाठी सराफ कट्टा येथे आल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, उपनिरीक्षक दिलीप ढेरे, संदीप गुरव, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, संदीप नलावडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.