सांगलीतील सराफाला पावणेचार कोटींचा गंडा, चौघे बंगाली कारागीर पावणेदोन किलो सोन्यासह पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 01:39 PM2024-09-18T13:39:06+5:302024-09-18T13:41:32+5:30
सांगली : दहा वर्षांपासून विश्वास संपादन करून सांगलीतील सराफास तब्बल तीन कोटी ६९ लाख ९७ हजार ९६ रुपयांचा मूळ ...
सांगली : दहा वर्षांपासून विश्वास संपादन करून सांगलीतील सराफास तब्बल तीन कोटी ६९ लाख ९७ हजार ९६ रुपयांचा मूळ पश्चिम बंगालच्या चौघा कारागिरांनी गंडा घातला. दागिने करण्यासाठी सोन्याचे लगड (चोख सोने) घेऊन सोने करून देतो, असे सांगून चौघे संशयित पसार झाले. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात महेश्वर कांतेश्वर जवळे (रा. ओम सम्मुखा, प्लॉट नं. २, साखर कारखान्यासमोर, माधवनगर रोड, सांगली) यांनी रविवारी फिर्याद नोंदविली आहे.
फिर्यादी महेश्वर जवळे यांच्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी संशयित गौतम गोपाल दास, रुमा गौतम दास, सौरभ गोपाल दास आणि सुभा ऊर्फ सुभो गोविंद दास (सर्व रा. आटपाडी, मूळ गाव गोपानगर, दक्षिणपाडा पूर्व मेदनापूर, पश्चिम बंगाल ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
महेश्वर जवळे यांचे सराफ पेठेत सोन्या-चांदी दागिने विक्रीचे दुकान आहे. संशयित गौतम दास हा पश्चिम बंगाल येथील कारागीर मागील दहा वर्षांहून अधिक काळापासून आटपाडी येथे राहण्यास आहे. त्याने जिल्ह्यातील अनेक सराफांच्या ओळखी करून घेतल्या होत्या. त्यांच्याकडून चोख सोने घेऊन त्यांना दागिने बनवून देण्याचे काम तो आणि त्याचे कुटुंबीय करीत होते.
फिर्यादी महेश्वर जवळे यांची देखील दास याच्याशी ओळख होती. दहा वर्षांपासून दास हा सराफ जवळे यांच्याकडून सोने घेऊन त्यांना दागिने तयार करून देत होता. दरम्यान, दि.३१ जुलै २०२४ ते दि.३० ऑगस्ट २०२४ या कालावधीत फिर्यादी जवळे यांच्याकडून संशयित दास याने तीन कोटी ६९ लाख ९७ हजार ५९६ रुपयांचे एक हजार ७७४ ग्रॅम वजनाचे सोने घेतले होते; मात्र सदर सोने घेऊन चौघे संशयित पसार झाले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.