कुपवाडला कारखान्यातून चार बालकामगारांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:20 AM2021-07-20T04:20:04+5:302021-07-20T04:20:04+5:30
कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील दिवा पॅकेज ॲन्ड ट्रेडर्स या कंपनीतील चार बालकामगारांची सांगलीतील सहाय्यक कामगार आयुक्तांनी सुटका केली. बालकामगार ...
कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील दिवा पॅकेज ॲन्ड ट्रेडर्स या कंपनीतील चार बालकामगारांची सांगलीतील सहाय्यक कामगार आयुक्तांनी सुटका केली. बालकामगार ठेवल्याप्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात कुपवाड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
संशयित कौशिक व्रजलाल अंकोला (रा. वृंदावन बंगला, धामणी रोड, सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. कुपवाड एमआयडीसीतील दिवा पॅकेज ॲन्ड ट्रेडर्स या बेदाणा बाॅक्स बनविणाऱ्या कंपनीत बालकामगार काम करत आहेत, असा निनावी दूरध्वनी सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयात सोमवारी सकाळी आला. त्यानुसार सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव, प्रकल्प अधिकारी सुर्यकांत कांबळे, लिपिक धनाजी जाधव, जयश्री मगदूम, सामाजिक कार्यकर्त्या सविता कुंभार यांनी कंपनीत जाऊन कामगारांची चौकशी करून १७ कामगारांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता चार मुली परप्रांतिय बालकामगार आढळून आल्या. अधिकाऱ्यांनी परप्रांतिय त्यांची सुटका केली. कंपनीतील कामगारांचे हजेरी बुक जप्त केले.
मालकाने परप्रांतीय चार बालकामगार मुली कामावर ठेवून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी लिपिक धनाजी जाधव यांनी मालक कौशिक अंकोला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.