निंबवडेत ९३ वर्षांच्या वृद्धाची चार मुले, नातवाकडून परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:18 PM2019-04-30T23:18:18+5:302019-04-30T23:18:24+5:30
आटपाडी : चार मुले सांभाळत नाहीत, १९७२ पासून दरमहा ५०० रुपये खर्चासाठी ठरलेले पैसे एकदाही दिलेले नाहीत, तसेच नातवाने ...
आटपाडी : चार मुले सांभाळत नाहीत, १९७२ पासून दरमहा ५०० रुपये खर्चासाठी ठरलेले पैसे एकदाही दिलेले नाहीत, तसेच नातवाने ढकलून दिल्याने, निंबवडे (ता. आटपाडी) येथील अण्णा लक्ष्मण येडगे (वय ९३) या आजोबांनी, त्यांची चार मुले आणि नातवाविरुद्ध आटपाडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
आटपाडी पोलिसांनी नामदेव अण्णा येडगे, दशरथ अण्णा येडगे, नाना अण्णा येडगे, दादा अण्णा येडगे (सर्व रा. येडगेवस्ती, निंबवडे) या त्यांच्या चार मुलांसह अजिनाथ नाना येडगे या नातवाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अण्णा येडगे यांच्या नावावर निंबवडे येथे गट नंबर २५६ मध्ये एक हेक्टर १३ आर जमीन होती. या जमिनीपैकी अर्धा एकर जमीन स्वत:कडे ठेवून उर्वरित जमीन त्यांनी चारही मुलांना वाटप करून दिली. १९७२ मध्ये हे जमिनींचे वाटप करण्यात आले. तेव्हा चारही मुलांनी प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये घरखर्च आणि औषधांसाठी त्यांना देण्याचे ठरले. महिन्यानंतर अण्णा येडगे यांनी जेव्हा थोरल्या मुलाकडे पैशाची मागणी केली, तेव्हा त्याने, ‘आधी तीन मुलांकडून घे, मग मी देतो’ असे सांगितले. त्यावर तिघांना पैसे मागितले, तर ‘आधी थोरल्याकडून घे, मग आम्ही देतो’असे म्हणत त्यांनी पैसे देण्याचे टाळले.
शेवटी अण्णा आणि त्यांच्या पत्नी भामाबाई या आजींनी शेळ्या पाळून उदरनिर्वाह करण्यास सुरुवात केली. दि. २८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अण्णा येडगे यांच्या मालकीच्या जमिनीच्या बांधावरील सुभाबळीच्या फांद्या त्यांचा नातू अजिनाथ तोडू लागला, तेव्हा त्यांनी, फांद्या तोडू नको, असे समजावून सांगितले. त्यावर नातवाने धक्काबुक्की करून ढकलून दिले. त्यामुळे अण्णा येडगे यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि चार मुलांसह नातवाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे करीत आहेत.
लळा, जिव्हाळा खोटाच... कुणी कुणाचे नाही!
सात वर्षापूर्वी भामाबाई गाईच्या खोंडाला भाकरीचा तुकडा चारत असताना, नातवाने त्यांना खाली पाडले. त्यांचा उजवा पाय खुब्यामध्ये मोडला. यावेळी त्यांच्या उपचारासाठी चारीही मुलांनी दमडी दिली नाही. अण्णा येडगे यांनी शेळ्या, म्हैस विकून उपचार केले. त्यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये भामाबार्इंना अर्धांगवायू झाला. तेव्हाही मुलांनी उपचारासाठी खर्च करण्यास नकार दिला. उसने पैसे घेऊन उपचार केले. याची फिर्यादीत नोंद केली आहे.