‘डॉल्बी’ला फाटा देत चार बंधारे बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 11:57 PM2017-08-08T23:57:40+5:302017-08-08T23:57:40+5:30

Four dams to be built by throwing the 'Dolby' | ‘डॉल्बी’ला फाटा देत चार बंधारे बांधणार

‘डॉल्बी’ला फाटा देत चार बंधारे बांधणार

Next



सचिन लाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गणरायाचे आगमन आणि विसर्जन पारंपरिक वाद्यांच्या गजरात व्हावे, तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यंदाही प्रयत्नशील आहेत. ‘डॉल्बीमुक्तीतून जलयुक्त शिवाराकडे’ हा संकल्प त्यांनी कायम ठेवला आहे. ‘डॉल्बी’ला फाटा देऊन बचत झालेल्या पैशातून यावर्षी जिल्ह्यात चार सिमेंट बंधारे साकारण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ‘डॉल्बी’ यंत्रणेच्या आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी कडक निर्देश देऊनही त्याचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे पोलिसप्रमुख शिंदे यांनी गतवर्षी ‘नो डॉल्बी’चा इशारा देत प्रबोधन मोहीम हाती घेतली. गावोगावी गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांच्या बैठका घेतल्या. उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन करून डॉल्बीला फाटा दिल्याने बचत झालेली रक्कम बंधारे बांधण्यास देण्याचे आवाहन केले. त्याला गणेश मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने सुमारे २७ लाखांची रक्कम या विधायक कामासाठी जमा झाली. यातून मल्लेवाडी (ता. मिरज) व मणेराजुरी (ता. तासगाव) येथे दोन बंधारे बांधण्यात आले. ‘सुखकर्ता’ व ‘दु:खहर्ता’ असे त्यांचे नामकरण केले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बंधाºयाची पाहणी करून कौतुक केले होते.
यंदाचा गणेशोत्सव पंधरा दिवसावर येऊन ठेपला आहे. उत्सव शांततेत पार पडावा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस नेहमीच प्रयत्नशील असतात. पण पोलिसप्रमुखांनी ‘नो डॉल्बी’ची सुरू केलेली मोहीम यावर्षीही कायम राहणार आहे. गणेश मंडळांच्या बैठका घेऊन डॉल्बीला फाटा देऊन त्यामधून जमा झालेली देणगी जलयुक्त शिवार योजनेस देण्याचे आवाहन केले जाणार आहे. दुर्गामाता, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवातही डॉल्बी न लावण्याचे आवाहन करून त्यामधून बचत झालेला पैसा बंधाºयांसाठी द्यावा, यासाठी मंडळांच्या पदाधिकाºयांचे प्रबोधन केले जाणार आहे. या उत्सवांच्या माध्यमातून जमा होणाºया देणगीतून बांधण्यात येणाºया बंधाºयांना गणेश, दुर्गा, शिव, भीम अशी नावे देण्यात येणार आहेत.
पाच हजारावर मंडळे
सांगली, मिरज व कुपवाड शहरात
८३५ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात चार हजार ५३४ मंडळे आहेत. ही संख्या केवळ नोंदणीकृत मंडळांची आहे. याशिवाय नोंदणी न केलेली अनेक मंडळे गल्ली-बोळात आहेत.
आवाजाची : मर्यादा
ध्वनिप्रदूषण नियमानुसार आवाजाची मर्यादा ६५ डेसिबल आहे. डॉल्बी किंवा ध्वनिवर्धकाच्या क्षेत्रात यापेक्षा जादा डेसिबलची नोंद यंत्रावर झाली, तर तो गुन्हा ठरतो. सांगलीत पोलिसांकडे ध्वनिमापनाची यंत्रे तपासणीसाठी उपलब्ध आहेत.
पाच वर्षे तुरुंगवास
सार्वजनिक ठिकाणी डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण केल्याचा गुन्हा पोलिसांकडून दाखल केला जातो. त्यावेळी ध्वनिमापन यंत्राने केलेल्या तपासणीचा दाखला देऊन आयोजकांसह डॉल्बी मालकाला न्यायालयाच्या कठड्यात उभे केले जाते. तिथे गुन्हा सिद्ध झाल्यास पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नुसार पाच वर्षे तुरूंगवास आणि एक लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. अशी शिक्षा झाल्यानंतरही गुन्हा केल्यास सात वर्षांपर्यंत तुरूंगवास होऊ शकतो.

Web Title: Four dams to be built by throwing the 'Dolby'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.