चार दिवसांनी बँका गजबजल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:26 AM2021-03-18T04:26:31+5:302021-03-18T04:26:31+5:30
सांगली : दोन दिवस सुटी व दोन दिवसांचा कर्मचाऱ्यांचा संप यामुळे सलग चार दिवस बंद असलेल्या सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत ...
सांगली : दोन दिवस सुटी व दोन दिवसांचा कर्मचाऱ्यांचा संप यामुळे सलग चार दिवस बंद असलेल्या सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका बुधवारी पुन्हा गजबजल्या. या कालावधीत ६ हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली.
केंद्र सरकारने घेतलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरण धोरणाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँक कर्मचारी सोमवार (दि. १५) पासून दोन दिवस संपावर गेले होते. शनिवारी व रविवारी बँकांची शासकीय सुटी होती. त्यानंतर सोमवारी व मंगळवारी संप झाल्याने सलग चार दिवस बँका बंद राहिल्या. त्यामुळे जिल्ह्याची आर्थिक उलाढाल ठप्प होती. माेठे आर्थिक व्यवहार, बँकांशी संबंधित अन्य कामे, कर्जवसुलीही ठप्प झाली होती. त्यामुळे बुधवारी बँका सुरू होताच ग्राहकांची गर्दी झाली. बँकेत पुन्हा लगबग सुरू झाली. कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे अनेक बँकांमध्ये बुधवारी ग्राहकांना टप्प्याटप्प्याने प्रवेश दिला जात होता. त्यामुळे काही ठिकाणी नागरिकांना ताटकळत थांबावे लागले. या सप्ताहात बँकांचे कामकाज तीनच दिवस चालणार आहे. त्यामुळे नागरिकांची कामे करण्यासाठी धांदल उडण्याची शक्यता आहे.