एकाच रुग्णाच्या रक्ताचे चार वेगवेगळे चाचणी अहवाल, विधानपरिषदेत आमदारांनी विचारला जाब

By संतोष भिसे | Published: July 27, 2023 05:51 PM2023-07-27T17:51:15+5:302023-07-27T17:52:24+5:30

सांगलीतील प्रयोगशाळांवर कारवाईची मागणी

Four different test reports of blood from the same patient, Ask MLAs in Legislative Council | एकाच रुग्णाच्या रक्ताचे चार वेगवेगळे चाचणी अहवाल, विधानपरिषदेत आमदारांनी विचारला जाब

एकाच रुग्णाच्या रक्ताचे चार वेगवेगळे चाचणी अहवाल, विधानपरिषदेत आमदारांनी विचारला जाब

googlenewsNext

सांगली : एकाच रुग्णाच्या रक्ताचे चार प्रयोगशाळांमध्ये वेगवेगळे चाचणी अहवाल आल्याचा प्रकार सांगलीतील डॉ. योगेश माईणकर यांनी उघडकीस  आणला होता. हा विषय विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करण्यात आला असून संबंधित प्रयोगशाळांवर कारवाईची मागणी आमदारांनी केली आहे.

आमदार अनिकेत तटकरे, सतीश चव्हाण व अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत आरोग्यमंत्र्यांना याविषयी विचारणा केली. त्यांनी सांगितले की, सांगलीतील आयुर्वेद वैद्य डॉ. योगेश माईणकर यांनी त्यांच्या एका मधुमेहग्रस्त रुग्णाच्या रक्ताची चार नामांकित प्रयोगशाळांमध्ये चाचणी केली. प्रत्येक प्रयोगशाळेतून चाचणीचे वेगवेगळे धक्कादायक अहवाल आले. एकामध्ये साखरेचे प्रमाण १२६ दर्शविले होते. दुसऱ्यामध्ये ३०० आणि तिसऱ्या प्रयोगशाळेने ३९० साखर सांगितली होती. चौथ्या प्रयोगशाळेच्या चाचणी अहवालात रक्तातील साखरेचे प्रमाण तब्बल ४२१ असल्याचे सांगितले होते.

आमदारांनी सांगितले की, चारही प्रयोगशाळा जुन्या असून तज्ज्ञ डॉक्टर्स तेथे काम करतात. तरीही असे चुकीचे व दिशाभूल करणारे अहवाल त्यांनी दिले आहेत. या अहवालांमुळे रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रयोगशाळांमध्ये रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरु असल्याचे स्पष्ट होते.

यावर आरोग्यमंत्र्यांनी उत्तर दिले की, डॉ. माईणकर यांनी यासंदर्भात आरोग्य विभागाकडे रितसर तक्रार दाखल केलेली नाही. जिल्हा शल्यचिकित्सक किंवा महापालिकेकडे दाद मागितली नाही, त्यामुळे चौकशी झालेली नाही. तथापि, हे प्रकरण थेट नागरिकांच्या जिविताशी निगडीत आहे, त्यामुळे एक चौकशी समिती नेमून त्याची रितसर चौकशी केली जाईल. दोषी सापडणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील. पॅथॉलॉजी प्रयोगशाळांच्या नोंदणीसाठी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल.

चांगला रुग्णही आजारी पडेल

आमदारांनी आरोग्य मंत्र्यांना सांगितले की, प्रयोगशाळांच्या चुकीच्या चाचणी अहवालांमुळे चांगला रुग्णही आजारी पडण्याचा धोका आहे. अहवालावर भरोसा ठेवून औषधोपचार घेतल्यास त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. या प्रयोगशाळांमध्ये रुग्णांच्या जिवाशी खेळ केला जात आहे. त्यामुळे या चार प्रयोगशाळांसह जिल्ह्यातील सर्वच प्रयोगशाळांची चौकशी करावी. दोषींवर कारवाई करावी.

Web Title: Four different test reports of blood from the same patient, Ask MLAs in Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.