जिल्ह्यात चौघांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:27 AM2021-03-26T04:27:09+5:302021-03-26T04:27:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : विटा आणि समडोळी (ता. मिरज) येथे पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा, तर मिरजवाडी (ता. ...

Four drowned in district | जिल्ह्यात चौघांचा बुडून मृत्यू

जिल्ह्यात चौघांचा बुडून मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : विटा आणि समडोळी (ता. मिरज) येथे पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा, तर मिरजवाडी (ता. वाळवा) येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने दोन तरुणांचा गुरुवारी बुडून मृत्यू झाला. चैतन्य सचिन वायदंडे (वय ९, रा. विटा) आणि शर्विल प्रशांत पाटील (१४, रा. समडोळी, ता. मिरज), अजय विजय भिसे (वय २४) व अजिंक्य रमेश जाधव (वय २५, दोघेही मूळ सांगवी, पुणे, सध्या रा. मिरजवाडी) अशी मृतांची नावे आहेत.

समडोळी येथील शर्विल पाटील आठवीत शिकत होता. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तो मित्रांसह पोहण्यास वारणा नदीत गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्यासोबतच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील तरुणांनी तसेच रेस्क्यू टीमच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

विटा येथील घटना जुना वासुंबे रस्त्यावरील हजारे मळा परिसरात घडली. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास चौथीमध्ये शिकणारा चैतन्य वायदंडे परिसरातील विहिरीत पाेहण्यास गेला होता. परंतु त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल पाटील यांनी सांगितले. चैतन्य कुटुंबीयांसमवेत हजारे मळा येथे राहण्यास होता. त्याचे वडील यंत्रमाग कामगार आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिरजवाडी (ता. वाळवा) येथे ग्रीन हाऊसच्या कामासाठी पुण्याहून अजय भिसे व अजिंक्य जाधव हे मजूर आले होते. मिरजवाडी येथील आवटी मळ्यात काम सुरू आहे. सकाळी नास्ता झाल्यानंतर मजुरांमधील एक तरुण नजीकच असलेल्या गायकवाड यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेला. त्यानंतर अजय भिसे व अजिंक्य जाधव हे दोघेही गेले. ते शेततळ्याच्या कडेला उभे होते. अचानक अजयचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला धरण्यासाठी अजिंक्य पुढे सरसावला, मात्र पोहता येत नसल्याने दोघेही शेततळ्यात बुडाले.

चौकट

पोहायला जाणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज

सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून, कोरोनामुळे शाळाही बंद आहेत. त्यामुळे मुले पालकांना सांगून तर कधी पालकांना न सांगता नदीमध्ये, विहिरीमध्ये, तलावांमध्ये पोहण्यास जातात. मुलांवर लक्ष ठेवल्यास अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात. जिल्ह्यात एकाच दिवशी दोन मुलांचा असा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Four drowned in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.