कुटुंबातील चौघांना शिऱ्यातून विषबाधा
By admin | Published: October 4, 2014 11:41 PM2014-10-04T23:41:50+5:302014-10-04T23:41:50+5:30
आंबेवाडीतील घटना : प्रकृती स्थिर
सांगली : शिळा शिरा खल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा झाली आहे. आंबेगाव (ता. कडेगाव) येथे शनिवारी ही घटना घडली. चौघांना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
बाजीराव महादेव यादव (वय ४०), त्यांची पत्नी निर्मला (३५), मुले सुशांत (७) व धनश्री (४) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे मूळगाव धोंडेवाडी (ता. खानापूर) आहे. गेल्या आठ वर्षांपासून ते आंबेगावमध्ये उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहेत. बाजीराव यादव हे पोल्ट्रीत काम करतात. त्यांची भावजयी रुक्मिणी अशोक जाधव यांचे गतवर्षी निधन झाले आहे. काल (शुक्रवार) वर्षश्राद्ध होते. यामुळे बाजीराव हे दोन मुलांना घेऊन श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी धोंडेवाडीला गेले होते.
कार्यक्रमात शिरा, भात, आमटी असे जेवण होते. सायंकाळी ते आंबेगावला परतले. येताना त्यांनी डब्यातून शिरा आणला होता. निर्मला यांनी हा शिरा अॅल्युमिनियमच्या भांड्यात ठेवून तो गरम केला होता. रात्री त्यांनी हा शिरा खाल्ला नाही. आज सकाळी सर्वांनी शिरा खाल्ला व मुले शाळेला गेली. (प्रतिनिधी)