सांगली जिल्ह्यातील चार घरफोडीच्या गुन्ह्यांतील चोरट्यांना अटक
By शरद जाधव | Published: December 7, 2022 08:16 PM2022-12-07T20:16:52+5:302022-12-07T20:17:32+5:30
सांगली जिल्ह्यातील चार घरफोडीच्या गुन्ह्यांतील चोरट्यांना अटक करण्यात आली आहे.
सांगली: जिल्ह्यातील संजयनगर, विटा, इस्लामपूर व तासगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील चार दरोडा, जबरी चोरीच्या गुन्ह्यांतील मुख्य संशयितास पोलिसांनी जेरबंद केले. महेश किरास चव्हाण (वय २१, रा. कोकणगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) व रोहित ऊर्फ सोन्या दीपक काळे (१९, रा. शिदा, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून सहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील जबरी चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करून चोरट्यांना जेरबंद करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर अधीक्षक आंचल दलाल यांनी दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पथक शहरात गस्तीवर होते. शहरातील साखर कारखाना परिसरात दोघे संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार तिथे जात त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; पण त्यानंतर घेतलेल्या झडतीत महेश चव्हाण याच्या खिशात चार ग्रॅमची सोन्याची अंगठी मिळाली. अधिक चौकशीत विटा येथे घरात घुसून, धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याची कबुली त्याने दिली. चव्हाण याने चोरीतील माल सातारा येथील एकाकडे ठेवल्याचीही माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पथकाने सातारा येथून सहा लाख रुपये किमतीचे १२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले. चव्हाण याला संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दुसरा संशयित रोहित काळे याने इंदापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केले आहेत. त्याला इंदापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
औद्योगिक वसाहतीतील जबरी चोरीचा छडा
ऐन दिवाळीत शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील माळी गल्ली येथे दरवाजा तोडून आत प्रवेश करत दागिने लंपास करण्यात आले होते. ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने खळबळ उडाली होती. ही जबरी चोरी याच संशयिताने केल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली आहे.