अथणीजवळ अपघातात चार ठार शाळेची मोटार-दुचाकीची धडक : जखमींमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:24 PM2018-01-18T23:24:48+5:302018-01-18T23:26:00+5:30
अथणी : येथील विजापूर राज्यमार्गावरील देसाईवाडी येथील शाळेची मुले ऐगळी क्रॉस येथे शाळेच्या मोटारीतून शाळेस जात असताना, त्यांची मोटार दुचाकीस धडकून पलटी झाल्याने चारजण ठार झाले
अथणी : येथील विजापूर राज्यमार्गावरील देसाईवाडी येथील शाळेची मुले ऐगळी क्रॉस येथे शाळेच्या मोटारीतून शाळेस जात असताना, त्यांची मोटार दुचाकीस धडकून पलटी झाल्याने चारजण ठार झाले, तर तीस जण जखमी झाले. जखमींमध्ये एका पालकासह सर्व विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मृतांमध्ये मोटारीचा चालक आणि दुचाकीवरील तिघांचा समावेश आहे. ही घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजता घडली. मृत यलहडगी, अरटाळ (ता. अथणी) येथील आहेत.नेहमीप्रमाणे देसाईवाडीहून मुले शाळेच्या मोटारीमधून शाळेला जात होती. या वाहनात (क्रुझर) क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी भरले होते. त्याचवेळी आरकेरी (जि. विजापूर) येथून देवदर्शन घेऊन यलहडगी (ता. अथणी)कडे तिघे दुचाकीस्वार येत होते. शाळेच्या मोटारीची त्यांच्या दुचाकीस धडक बसली. धडकेनंतर मोटार दुचाकीवरच पलटी झाली. या अपघातामध्ये आप्पासाहेब संबू मराठी (वय ४०), मनोज दोडमनी (३२) व धानाप्पा मगदूम (३८, सर्व रा. यलहडगी) हे तिघे दुचाकीस्वार व मोटारचालक सिद्धिगिरी सिद्धाप्पा पुजारी (३०, रा. अरटाळ ता. अथणी) हे जागीच ठार झाले.
अपघातात आकाश गायकवाड, दीपक गायकवाड, सागर ठक्कनावर, आकाश ठक्कनावर, विकास माने, नेहाल माने, प्रभू हालेली हे सात विद्यार्थी व पालक संपत जगताप (६५) हे गंभीर जखमी झाले. त्यांना अथणी आणि मिरज येथील शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. इतर २२ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत ऐगळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.