सांगलीत साडेचार लाखांच्या बनावट नोटा जप्त, कोल्हापुरातील तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 11:19 AM2023-10-06T11:19:42+5:302023-10-06T11:30:29+5:30
नोटांबाबत तपासाचे आव्हान
सांगली : शहरातील नेमिनाथनगर परिसरातील कल्पद्रुम मैदानाजवळ साडेचार लाखांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या तिघांना विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले. वाहीद रफिक पठाण (वय २३, रा. यादवनगर, जयसिंगपूर), जमीर शौकत बागवान (३८, इरगोंडा पाटील नगर, कबनूर, इचलकरंजी) आणि संतोष श्रीकांत हत्ताळे (३२, संगमनगर, तारदाळ, ता.हातकणंगले) अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांकडे या नोटा कशा आल्या आणि त्यांना कुणी दिल्या याचा आता पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथक शहरात गस्तीवर होते. कल्पद्रूम मैदानाजवळ तिघे जण संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे पथकाला दिसून आले. तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याजवळ असलेल्या सॅकमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल असल्याचे दिसले.
पोलिसांच्या चौकशीत त्या नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. चार लाख ३८ हजार ५०० रुपयांच्या या बनावट होत्या. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नोटांबाबत तपासाचे आव्हान
कोल्हापूर जिल्ह्यातील तिघाही संशयितांकडे मोठ्या संख्येने बनावट नोटा आढळून आल्या. या नोटा त्यांना कुठून मिळाल्या. ते सांगलीत या नोटा घेऊन कशासाठी आले होते. यासह इतर तपासाचे आव्हान पोलिसांसमोर आहे.