सांगलीत मोटारीची काच फोडून चार लाखांची रोकड लंपास
By शरद जाधव | Published: November 29, 2022 09:11 PM2022-11-29T21:11:42+5:302022-11-29T21:11:56+5:30
विश्रामबाग येथील प्रकार; पाळत ठेवून चोरट्यांकडून डल्ला
सांगली : शहरातील विश्रामबाग येथील शंभरफुटी रस्त्यावर लावलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी तीन लाख ९० हजार रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी अमोल अशोक चौगुले (रा. बिरनाळे शाळेजवळ, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.
फिर्यादी चौगुले यांचा संगणक विक्रीचा व्यवसाय असून, मंगळवारी सकाळी व्यावसायिक कारणासाठी शिरोळ येथील बँकांतून त्यांनी तीन लाख ९० हजार रुपयांची रोकड काढली होती. यानंतर त्यांनी ही रक्कम चालकाशेजारी असलेल्या डिक्कीत ठेवली होती. चौगुले व त्यांचा चालक दोघे शिरोळ येथून सांगलीत आले व शंभरफुटी रस्त्यावरील एका हॉटेलसमोर मोटार लावून ते कामासाठी जवळच गेले होते.
नेमकी याचीच संधी साधत चोरट्यांनी सुरुवातीला मोटारीच्या पाठीमागील काच फोडण्याचा प्रयत्न केला. ती न फुटल्याने त्यांनी डाव्या बाजूच्या दरवाजाची काच फोडली व त्यानंतर डिक्कीचे लॉक तोडून आतील रोकड लंपास केली. थोड्या वेळानंतर चौगुले व त्यांचे चालक अरुण हडपद मोटारीजवळ आल्यानंतर त्यांना काच फुटल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर डिक्कीतील रोकडही लंपास झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ विश्रामबाग पोलिस ठाण्यात येत फिर्याद दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करत तपास सुरू केला आहे.
चौकट
पाळत ठेवूनच डल्ला
शिराेळ येथे बँकेतून पैसे काढल्यापासूनच दोन तरुण त्यांच्या मागावर असल्याची शक्यता आहे. चालक हडपद यांनीही पोलिसांना याबाबतची माहिती दिली. गेल्याच आठवड्यात आष्टा येथेही अशाच प्रकारे मोटारीची काच फोडून रोकड लंपास करण्यात आली होती.