पेठ-सांगली रस्त्याचे चौपदरीकरण ठप्प
By admin | Published: January 13, 2015 11:44 PM2015-01-13T23:44:01+5:302015-01-14T00:29:37+5:30
वाहतुकीची कोंडी : छोटे-मोठे अपघात बनले नित्याचे
सुरेंद्र शिराळकर - आष्टा - पेठ-सांगली रस्त्यावरील प्रमुख गाव म्हणजे आष्टा. पेठ-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. आष्टा येथे आष्टा लायनर्स, पोलीस ठाणे, एसटी स्टँड चौक, दुधगाव रस्ता ते डांगे कॉलेज स्टॉपपर्यंत व तुंग ते सांगलीवाडीपर्यंत रस्त्याचे काम सुरु आहे. आष्टा परिसरातील रस्त्याचे चौपदरीकरण न झाल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. ऊस वाहतुकीमुळे आधीच व्यस्त असलेल्या या रस्त्याला जत्रेचे स्वरुप येत आहे. वाहतुकीची कोंडी व छोटे-मोठे अपघात ही नित्याचीच बाब झाली आहे. संथ गतीने सुरु असलेले चौपदरीकरणाचे काम पूर्ण कधी होणार? याच्या प्रतीक्षेत प्रवासी आहेत.
आष्टा हे माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील मोठे व माजी आमदार विलासराव शिंदे यांचे गाव. आष्टा शहरात अनेक विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत.
शहरात अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय, डांगे आयुर्वेद, वैद्यकीय महाविद्यालय, डी. एड्., बी. एड्., एम. एड्., नर्सिंग, आय. टी. आय. यासह आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, के. बी. पी. इंग्लिश मिडीअम स्कूल, कन्या विद्यालय, १६ प्राथमिक शाळा, शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, पतसंस्था, सह. सोसायट्या कार्यरत आहेत.
सांगली-इस्लामपूर, कोल्हापूर-तासगाव या गावांना जोडणारे आष्टा हे प्रमुख शहर असल्याने अनेक नोकरदार आष्टा येथे वास्तव्यास आहेत. आष्टा ते सांगली, इस्लामपूर ते कोल्हापूर, तासगाव या परिसरातून अनेक विद्यार्थी व नोकरदार आष्ट्याहून नियमित प्रवास करीत असतात. आष्टा बसस्थानकावर प्रचंड गर्दी होत असते. सांगली इस्लामपूर रस्त्यावर तर नेहमीच वाहनांची गर्दी असते. त्यात चौपदरीकणाचे काम सुरु झाल्यापासून, येथून प्रवास करताना जीव मुठीत धरुनच प्रवास करावा लागतो.
आष्टा शहरापासून ३ ते ५ कि.मी. परिसरात वाहनांची गर्दी असते. जुना शिंदे मळा, आष्टा लायनर्स, कन्या विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, के. बी. पी. इंग्लिश मिडीयम स्कूल, बसस्थानक ते आष्टा नाका, थोटे डेअरी, डांगे स्टॉप, लोकमान्य शाळा ते मिरजवाडी या मार्गावर चारचाकी, दुचाकी वाहने भरधाव वेगात येतात. ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाड्या वाहतुकीला अडथळा ठरत आहेत.
एकूणच पेठ- सांगली रस्त्याच्या या कामामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हे काम पूर्ण करावे अन्यथा रोषाला बळी पडावे लागेल, असा इशारा नागरिकांतून होत आहे.
आष्ट्यात अपघाताचा सापळा
आष्टा बसस्थानकासमोर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात सांगली-इस्लामपूर रस्त्याच्या पूर्व व पश्चिम बाजूस पेठवडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर व लोकनेते राजारामबापू पुतळ्यासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून वाळूची पोती भरुन ठेवली आहेत. मात्र या चौकात जागा अपुरी असल्याने संबंधितांनी दुभाजक लहान करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.