मोहनराव कदम यांच्यासह कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण; शांताराम कदम यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 02:02 PM2020-08-16T14:02:56+5:302020-08-16T14:03:43+5:30
स्वतः शांताराम कदम यांनी दूरध्वनीवरुन पत्रकारांना माहिती दिली.
सांगली : सांगली-सातारा विधानपरिषद मतदारसंघाचे आमदार मोहनराव कदम यांच्यासह त्यांच्या पत्नी यशोदा व त्यांचे पुत्र सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम व नातू दिग्विजय कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः शांताराम कदम यांनी दूरध्वनीवरुन पत्रकारांना माहिती दिली.
काही दिवसांपूर्वीच आमदार मोहनराव कदम यांचे पुत्र व भारती हॉस्पिटल, सांगलीचे मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम व नातू डॉ. जितेश कदम तसेच डॉ. जितेश यांच्या मातोश्री यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजले. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी आमदार मोहनराव कदम यांच्यासह कुटुंबातील चौघांचा कोरोनाची चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय आमदार मोहनराव कदम यांचे वाहनचालक पिंटू मोकळे, शांताराम कदम यांचे स्वीय सहाय्यक विश्वास महाडिक, संपर्कातील इरप्पा कोळी हा कार्यकर्ता असे एकंदरीत सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाच एकूण कोरोना प्रतिबंधाच्या नियोजन प्रक्रियेत मार्गदर्शकाची भूमिका पार पडणाऱ्या आमदार मोहनराव कदम यांना कोरोनाची लागण होणे धक्कादायक आहे. आमच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, शिवाय किमान आठवडाभर विलगीकरणात रहावे असे अवाहन शांताराम कदम केले आहे. दरम्यान, बंधू डॉ. हणमंतराव कदम कोरोनामुक्त होऊन १६ ऑगस्टरोजी घरी परतले आहेत, अशी माहितीही शांताराम कदम यांनी दिली.
आमदार मोहनराव कदम यांची प्रकृती ठणठणीत
आमदार मोहनराव कदम यांची प्रकृती ठणठणीत आहे. दक्षता म्हणून त्यांना भारती हॉस्पिटल, पुणे येथे उपचारासाठी दाखल केले आहे. ते लवकरच बरे होऊन पुन्हा जनतेच्या सेवेसाठी सक्रिय होतील. आमची व सर्व कुटुंबियांची व संपर्कात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृतीही ठणठणीत आहे असे शांताराम कदम यांनी सांगितले.