विटा येथे फलकावर उपमुख्यमंत्र्यांसह चार मंत्री दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:26 AM2021-03-25T04:26:09+5:302021-03-25T04:26:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : विटा येथील तहसील कार्यालयाच्या आवारात समाजकल्याण विभागाने उभारलेला माहिती फलक वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा येथील तहसील कार्यालयाच्या आवारात समाजकल्याण विभागाने उभारलेला माहिती फलक वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वगळता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री जयंत पाटील, समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे व सहकार आणि कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम या चार मंत्र्यांना दुर्लक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
विटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने समाजकल्याण विभागाचा फलक लावण्यात आला आहे. अनुसूचित जातीच्या सहकारी, औद्योगिक संस्थांना अर्थसाहाय्य योजनेची माहिती या फलकावर देण्यात आली आहे; परंतु या फलकावर केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच फोटो आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री धनंजय मुंडे व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे फोटा न वापरता त्यांची केवळ नावेच छापली आहेत.
त्यामुळे शिवसेना पक्षाला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वावडे आहे की जिल्हा माहिती कार्यालय व सांगलीच्या समाजकल्याण विभागाला या मंत्र्यांचे फोटो टाकण्यात गैर वाटत आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांतून विचारला जात आहे.
दरम्यान, राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आहे. राष्ट्रवादीचे नेते गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग व सचिन वाझे प्रकरणाने राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. त्यातच शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे सरकार हे शिवसेनेची मजबुरी असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली होती. आता विटा शहरात शासनाच्या फलकावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांसह चार मंत्र्यांची केवळ नावे टाकली; पण फोटो छापले गेले नसल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.