चार महिन्यांच्या चिमुकलीच्या हृदयात छिद्र, मोफत शस्त्रक्रियेने जीव वाचला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 10:00 AM2023-12-19T10:00:57+5:302023-12-19T10:12:43+5:30

जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानांतर्गत झाली मोफत हृदय शस्त्रक्रिया.

Four-month-old baby with hole in heart, free surgery saves life | चार महिन्यांच्या चिमुकलीच्या हृदयात छिद्र, मोफत शस्त्रक्रियेने जीव वाचला

चार महिन्यांच्या चिमुकलीच्या हृदयात छिद्र, मोफत शस्त्रक्रियेने जीव वाचला

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील ४ महिने वयाच्या चिमुरडीवर जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाच्या माध्यमातून मुंबई येथील रुग्णालयात मोफत हृदय शस्त्रक्रिया करून तिला जीवदान देण्यात आले. माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी या चिमुकलीच्या घरी जाऊन तिची विचारपूस करत त्या कुटुंबाच्या जीवनात आनंदाचे क्षण पेरले. यावेळी प्रा. श्यामराव पाटील उपस्थित होते.

अक्षय व निलम चांदणे या दाम्पत्याची श्रावणी ही कन्या आहे. लग्नानंतर ६ वर्षांनी चांदणे कुटुंबाच्या संसार वेलीवर श्रावणी नावाचे फूल उमलले. त्यामुळे चांदणे कुटुंब आनंदून गेले होते.

मात्र हा आनंद फार काळ टिकणार नाही. जन्मताच श्रावणी अशक्त असल्याने तिची प्रकृती वारंवार बिघडत होती. मुंबई येथे रुग्णालयात तिची तपासणी केल्यावर हृदयाला छिद्र असल्याचे निदर्शनास आले. या शस्त्रक्रियेसाठी ४ लाखांचा खर्च ऐकून चांदणे कुटुंब हादरून गेले होते.

याचवेळी राजारामबापू बँकेचे संचालक अशोक पाटील, डॉ. हणमंत पाटील यांना ही घटना समजताच त्यांनी अभियानचे समन्वय इलियास पिरजादे, शशिकांत वायदंडे यांना सांगितली. त्यावर आ. जयंत पाटील, युवानेते प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावणीवर मुंबई येथील रुग्णालयामध्ये हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.

जयंत अभियानामुळे आमच्या ४ महिन्यांच्या मुलीस जीवदान मिळाले. आम्ही आ. जयंत पाटील व प्रतीक पाटील यांचे ऋण आयुष्यभर विसरणार नाही, अशी भावना श्रावणीच्या आई-वडिलांनी व्यक्त केली. माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी मागील एका वर्षात ४ कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधी मंजूर करुन घेतला आहे.  

Web Title: Four-month-old baby with hole in heart, free surgery saves life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.