जिल्ह्यात चार नगरपंचायती, एक नगरपालिका
By admin | Published: March 18, 2016 12:15 AM2016-03-18T00:15:34+5:302016-03-18T00:15:34+5:30
अधिसूचना जारी : कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूर, शिराळा नगरपंचायती, पलूस पालिका
सांगली : गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत असलेल्या तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपंचायत अथवा नगरपरिषद स्थापन करण्याच्या शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. जिल्ह्यात कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूर व शिराळा याठिकाणी नगरपंचायती, तर पलूस येथे नगरपरिषद स्थापन करण्याची अधिसूचना गुरुवारी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आदेशामुळे या पाच ठिकाणच्या ग्रामपंचायतींचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. शासनाच्या पुढील मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबतची माहिती तातडीने मुख्य कार्यालयास देण्यात येणार असल्याने गुरुवारी दुपारनंतर त्याची लगबग जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून येत होती. सायंकाळी उशिरापर्यंत माहिती संकलनाचे काम सुरू होते. गेल्या दोन वर्षांपासून तालुक्याचे मुख्यालय असलेल्या ठिकाणी नगरपंचायती अथवा नगरपरिषदा स्थापन करण्याबाबत शासकीय स्तरावरून हालचाली सुरू होत्या. याबाबत नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या. आता जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूर, शिराळा येथे नगरपंचायत अस्तित्वात येणार आहे, तर पलूस येथे नगरपरिषद स्थापन होणार आहे. या तालुक्यांच्या ठिकाणच्या लोकसंख्येच्या आधारावर पंचायती स्थापन होणार आहेत.
याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर आता शासनस्तरावरून या पाच शहरांची लोकसंख्या, प्रभाग रचना, हद्द निश्चित करण्यासाठीची प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्ह्यात अगोदरच पाच ठिकाणी नगरपालिका अस्तित्वात असून, आता या नवीन निर्णयामुळे जिल्ह्यातील नागरी क्षेत्रात वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील यापूर्वीच्या जत वगळता चार नगरपालिकांच्या निवडणुका वर्षभरात होणार आहेत. त्यांच्यासोबत आता या नवीन चार नगरपंचायती व एका नगरपरिषदेसाठीही एकाचवेळी निवडणुका होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)