मुलीच्या आत्महत्येप्रकरणी चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:17 AM2018-11-29T00:17:13+5:302018-11-29T00:17:20+5:30
इस्लामपूर : शहरातील मंत्री कॉलनी परिसरातील बारावर्षीय शाळकरी मुलीने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांत बुधवारी चौघांविरुध्द, तिला आत्महत्येस प्रवृत्त ...
इस्लामपूर : शहरातील मंत्री कॉलनी परिसरातील बारावर्षीय शाळकरी मुलीने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांत बुधवारी चौघांविरुध्द, तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत, पतीसह त्याची रखेल आणि सासू-सासऱ्याविरुध्द आरोप केले आहेत.
यातील स्वप्नाली ऊर्फ माधुरी सुरेश हेगाणा हिला पोलिसांनी अटक केली. आहे. अश्विनी कृष्णात कोरे (वय ३0, मूळ रा. आष्टा नाका, इस्लामपूर, सध्या तळसंदे, ता. पन्हाळा) यांनी फिर्याद दिली आहे.
अंजली कृष्णात कोरे असे मृत मुलीचे नाव आहे. कृष्णात सदाशिव कोरे, सदाशिव बंडू कोरे, शशिकला सदाशिव कोरे यांचा संशयितांमध्ये समावेश आहे.
अश्विनी कोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत, पती कृष्णात याने आठ वर्षांपूर्वी स्वप्नाली ऊर्फ माधुरी सुरेश हेगाणा हिच्याशी संसार थाटला होता. तो तिच्यासह मंत्री कॉलनी परिसरात वेगळा राहत होता. अधुनमधून आष्टा नाका येथे घरी येऊन आपल्याशी भांडण, वादविवाद करुन, मुलांना जबरदस्तीने त्याच्याकडे राहण्यास घेऊन जात होता. त्यावेळी स्वप्नाली ही अंजलीला त्रास देऊन तिच्याकडून जबरदस्तीने घरातील धुणी-भांडी, तसेच साफसफाई करवून घेत होती. आष्टा नाका येथील घरात सासू व सासरेदेखील तिला त्रास देत होते.
१५ दिवसांपूर्वी कृष्णात कोरे याने आपल्याशी भांडण काढून मारहाण करुन, ट्रक घेण्यासाठी आई-वडिलांकडून एक लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून घरातून बाहेर काढले. त्यावेळी सासू-सासºयानेही, पैसे घेऊन ये, नाही तर ठार मारू, अशी धमकी दिली. त्यामुळे मुलीच्या मृत्यूस हे चौघेच जबाबदार असून, माहेरहून पैसे आणण्याकरिता आपलाही शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक डी. पी. शेडगे अधिक तपास करत आहेत.
अंत्यदर्शन घेण्यास आईला विरोध
ज्या वयात खेळायचे, बागडायचे, त्या न कळत्या वयात अंजलीला कौटुंबिक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यातून आपले जीवन संपवावे, अशी तिच्या बाळबोध मनाची झालेली भावना आणि त्याच त्वेषातून तिची संपलेली जीवनयात्रा अंगावर शहारे आणणारी आहे. त्यावर कळस म्हणजे अंजलीचा मृतदेह घरी आणल्यानंतर तिच्या आईला तिचे अंत्यदर्शन घेण्यास झालेला विरोध, हाही तितकाच संतापजनक ठरला.