इस्लामपुरातील आणखी चार टोळ्या ‘मोक्का’च्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 08:45 PM2019-01-25T20:45:12+5:302019-01-25T20:46:08+5:30
शहरातील २ गुंडांच्या टोळ्यांना ‘मोक्का’ लावल्यानंतर अजून ४ टोळ्या या कारवाईच्या रडारवर आहेत. आता तडीपारीसारखी कारवाई न करता आर्थिक लाभ आणि वर्चस्ववादासाठी सावकार आणि भूखंड माफियांनी एक जरी गुन्हा केला तरी, त्यांच्या चुकीला क्षमा नाही.
इस्लामपूर : शहरातील २ गुंडांच्या टोळ्यांना ‘मोक्का’ लावल्यानंतर अजून ४ टोळ्या या कारवाईच्या रडारवर आहेत. आता तडीपारीसारखी कारवाई न करता आर्थिक लाभ आणि वर्चस्ववादासाठी सावकार आणि भूखंड माफियांनी एक जरी गुन्हा केला तरी, त्यांच्या चुकीला क्षमा नाही. पोस्टरवरील गुंडाराज आणि आता मोक्काबरोबरच झोपटपट्टीदादा कायद्याची कठोर अंमलबजावणी करुन वाळवा—शिराळ्यातील गुंडांच्या टोळ्या नेस्तनाबूत करणार असल्याचा इशारा पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिला.
येथील उपअधीक्षक कार्यालयात पिंगळे यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच पत्रकार बैठकीत आपल्या कामाची दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर येथील गुंडांच्या कुंडल्या काढल्या असता, परिस्थिती फारच भयानक असल्याचे निदर्शनास आले. सोन्या शिंदे आणि अनमोल मदने गँगला मोक्का लावल्यानंतर या टोळ्यांचे कारनामे समोर येऊ लागले आहेत. त्यांनी येथील व्यापाऱ्यांना ५ लाखापासून १५ लाखांपर्यंत लुबाडल्याचे चौकशीत स्पष्ट होत आहे.
पिंगळे म्हणाले, यापुढे पोस्टरवरील गुंडाराज संपुष्टात आणू. नगरपालिका, ग्रामपंचायती आणि पोलिसांची नाहरकत असल्याशिवाय कुठेही पोस्टर लागू देणार नाही. बेकायदा पोस्टर लावल्यास जागा देणारा आणि पोस्टरची छपाई करणारांनाही सहआरोपी केले जाईल. मोक्का कारवाईतील गुंडांना आश्रय देऊन त्यांना मदत करणाºया मास्टरमार्इंडवरही कारवाई होईल.
संघटित गुन्हेगारीसह सावकारी आणि भूखंड माफियांवरही लक्ष केंद्रित करणार आहोत. इस्लामपूर पोलीस उपविभागातील समाजजीवन आणि महिला—मुलींच्या संरक्षणाबाबत प्राधान्य देणार आहोत. चूक करणाºयाला माफी नाही, या पध्दतीने काम करताना कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नसल्याचे पिंगळे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक (मोक्का) कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एखाद्या टोळीविरुध्द गंभीर गुन्'ासाठी किमान २ आरोपपत्र न्यायालयात दाखल होणे आवश्यक आहे. सोन्या शिंदे गँगची कुंडली काढल्यानंतर, त्याच्या टोळीविरुध्द खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, रॉबरी आणि अपहरणाचे २६ गुन्हे नोंद असल्याचे समोर आले. या टोळीविरुध्द तब्बल २१ आरोपपत्रे न्यायालयात दाखल झाली आहेत. ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर मोक्काचे प्रस्ताव तयार केले. या सर्वांची रवानगी येरवडा कारागृहात होईल.