विट्याजवळ भीषण अपघातात चार जण जागीच ठार; खासगी बसची मोटारीला धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 08:32 AM2023-05-05T08:32:08+5:302023-05-05T08:32:14+5:30
मृत मूळचे गव्हाणचे, मालाडहून यात्रेसाठी गावी येत होते
विटा (जि.सांगली) : भरधाव वेगातील खासगी बसने विट्याकडे येणाऱ्या मोटारीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटारीतील चारजण जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विटा (ता. खानापूर, जि. सांगली) शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर नेवरी राज्य मार्गावर झाला.
अपघातात सुनीता सदानंद काशीद (वय ६१), त्यांचे दीर चंद्रकांत दादोबा काशीद (वय ६२, दोघेही रा. गव्हाण, ता. तासगाव, सध्या रा. मालाड, मुंबई), सुनीता यांचा भाऊ अशोक नामदेव सूर्यवंशी (वय ६४, रा. बिसूर, ता. मिरज, सध्या रा. मालाड, मुंबई) व मोटारीचा बदली चालक योगेश विलास कदम (वय ३५, रा. बोरिवली, मागाठाणे, मुंबई) हे चौघे जागीच ठार झाले. या अपघातात सुनीता यांचे पती सदानंद दादोबा काशीद (वय ६९, रा. गव्हाण) हे जखमी झाले आहेत.
सांगली जिल्ह्यातील गव्हाण (ता. तासगाव) येथील सदानंद काशीद व त्यांचे भाऊ चंद्रकांत हे कुटुंबीयांसह मालाड येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या गावी लक्ष्मी देवीची यात्रा शुक्रवारपासून सुरू होत आहे. या यात्रेसाठी काशीद कुटुंबीय गुरुवारी मध्यरात्री बदली चालक योगेश कदम यांना घेऊन मुंबईहून गव्हाणकडे निघाले होते. त्यावेळी मोटारीत चालकासह पाचजण होते.
त्यांची मोटार क्रमांक (एमएच ४७, एजी ९५४) ही विटा शहराजवळ नेवरी रस्त्याच्या उतारावर आली असताना विट्याहून प्रवासी उतरवून नेवरीकडे निघालेली गीतांजली ट्रॅव्हल्सची खासगी बस क्रमांक (एआर ०१, जे ८४५२)च्या चालकाने विरुद्ध दिशेला मोटारीच्या बाजूला जाऊन जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, मोटारीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातात चालकाच्या बाजूला बसलेले सदानंद काशीद हे एअरबॅग उघडल्याने बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर मोटारीतील त्यांची पत्नी सुनीता काशीद, भाऊ चंद्रकांत, मेहुणा अशोक सूर्यवंशी आणि चालक योगेश कदम हे जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती मिळताच विटा पोलिसांनी घटनास्थळी येत मदतकार्य केले.