Sangli: जतमध्ये पूर्ववैमनस्यातून घरात घुसून चौघांना बेदम मारहाण; अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 16:09 IST2024-06-01T16:08:13+5:302024-06-01T16:09:43+5:30
तेरा जणांवर गुन्हे

Sangli: जतमध्ये पूर्ववैमनस्यातून घरात घुसून चौघांना बेदम मारहाण; अल्पवयीन मुलीचा विनयभंग
जत : शहरातील पारधी तांड्यात पूर्ववैमनस्यातून चौघांना बेदम मारहाण करून अल्पवयीन मुलीसोबत झोंबाझोंबी करून तिचा विनयभंग तसेच दोन चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. शुक्रवारी पहाटे २:३० ते ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी १३ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत पीडित मुलीने जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी बसवराज रामचंद्र चव्हाण, देवराज बसवराज चव्हाण, दीपक रामचंद्र चव्हाण, धनजंय दीपक चव्हाण, राकेश आप्पा चव्हाण, हेमलता बसवराज चव्हाण, पूजा देवराज चव्हाण, धानेश्वरी ऊर्फ धनश्री धनंजय चव्हाण, छाया रामचंद्र चव्हाण, पारूबाई आप्पा चव्हाण, कोमल दीपक चव्हाण, जिजाबाई रामचंद्र चव्हाण व अभी धनंजय चव्हाण (सर्व रा. आंबेडकरनगर, उमराणी रोड, पारधी तांडा, जत, ता. जत) अशा तेरा जणांवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संशयितांनी फिर्यादीच्या घराचा दरवाजा तोडून, घरात घुसून फिर्यादीसह फिर्यादीचे पती, आई, मुलीस काठ्या, कुऱ्हाडीच्या दांड्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आहे. फिर्यादीच्या पुतणीसोबत झोंबाझोंबी करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.
फिर्यादीच्या मदतीकरिता आलेल्या राहुल गोपाळ काळे, राहुल गोंविद चव्हाण, मीनाबाई गोपाळ काळे, पारू राहुल चव्हाण, गोविंद ऊर्फ पवन राजू काळे, रेश्मा शंकर काळे यांनाही काठ्या, कुऱ्हाडीचा दांडा, लोखंडी रॉडने, दगडाने मारहाण करून जखमी केले आहे. तसेच चारचाकी (क्र. एमएच १० डीएल २४२१), चारचाकी (क्र. एमएच ४३ एजे ४८७७)च्या समोरील व पाठीमागील काचा फोडून नुकसान केले आहे. यामध्ये महिलेचे गंठण, दुसरीचे मंगळसूत्र तोडून गहाळ केले आहे. या घटनेची नोंद झाली असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड करत आहेत.