Sangli: थांबलेल्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकची धडक, चिमुकलीसह चौघे ऊसतोड मजूर ठार; १० जण जखमी
By हणमंत पाटील | Published: April 2, 2024 12:32 PM2024-04-02T12:32:36+5:302024-04-02T12:32:56+5:30
ऊसतोडणी संपवून कुटुंबासह घरी परतताना मजुरांवर काळाचा घाला
महेश देसाई
कवठेमहांकाळ: ऊसतोडणीचं काम संपवून घराकडे परतताना रस्त्यालगत थांबलेल्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत चिमुकलीसह चौघां ऊसतोडणी मजुरांचा मृत्यू झाला. तर तब्बल 10 जण जखमी झाले. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अगळगाव फाटा येथे आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली आहे.
शालन दत्तात्रय खांडेकर (वय 30, रा. शिरनांदगी), लगमा तम्मा हेगडे (35), दादा आप्पा ऐवळे (17), निलाबाई परशुराम ऐवळे (3, रा. चिक्कलगी ता. मंगळवेढा जि. सोलापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्यातील काही मजूर हे शिरोळ परिसरात ऊस तोडणीसाठी काही महिन्यांपूर्वी आले होते. यंदाचा गळीत हंगाम संपवून काही मजूर गावाकडे परतत होते. मध्यरात्री दोन वाजता ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाला, त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभा करुन दुरुस्त केला जात होता.
दरम्यान, पाठीमागून आलेल्या ट्रकनं पाठिमागून ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. या धडकेत शालन खांडेकर, लगमा हेगडे, दादा ऐवळे, निलाबाई ऐवळे यांचा जागीच मृत्यू झाला आणि 10 जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले.