नाटोलीच्या तरुणाकडून चार तलवारी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:27 AM2021-05-21T04:27:35+5:302021-05-21T04:27:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : बेकायदेशीरपणे तलवारी जवळ बाळगणाऱ्या नाटोली (ता. शिराळा) येथील तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : बेकायदेशीरपणे तलवारी जवळ बाळगणाऱ्या नाटोली (ता. शिराळा) येथील तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. रोहन प्रताप नाकील (वय २२) असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून २८०० रुपये किमतीच्या चार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी खास पथक तयार केले आहे.
एलसीबीचे पथक शिराळा तालुक्यातील गुन्ह्यांची माहिती घेत असताना, त्यांना बिऊर फाटा येथील शेती विभाग कार्यालयाजवळ दुकानासमोर तरुण पोत्यात घातक शस्त्र घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा मारून त्याची चौकशी केली. त्यात त्याच्याजवळ एक तलवार मिळाली तर अन्य तीन तलवारी त्याने घरात लपवून ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार ही घातक शस्त्रे जप्त करून आर्म ॲक्टनुसार शिराळा पोलिसांत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपनिरीक्षक अभिजित सावंत यांच्यासह मारुती साळुंखे, सुनील चौधरी, गजानन घस्ते, कुबेर खोत यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.