सांगली: लंगरपेठला सावकाराच्या दोन घरांवर छापे, संशयित फरारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 06:29 PM2022-10-19T18:29:13+5:302022-10-19T18:30:50+5:30
सहायक निबंधक मोहिते यांनी मंगळवारी चार पथके नेमून लंगरपेठ येथील शिंदे याच्या राहत्या घराची व शेतातील घराची झडती घेतली.
शिरढोण : लंगरपेठ (ता. कवठेमहांकाळ) येथील विश्वनाथ लक्ष्मण शिंदे (वय ४५) या खासगी सावकाराच्या दोन घरांवर कवठेमहांकाळचे सहायक निबंधक बिपीन मोहिते यांच्या चार पथकांनी मंगळवारी एकाच वेळी छापे टाकले. शिंदे याच्या राहत्या घराची, तसेच शेतातील घराची झडती घेऊन फेरफार उतारे, कोरे धनादेश यासह वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे ताब्यात घेतली.
विश्वनाथ शिंदे खासगी सावकारी करीत असल्याबाबतचा निनावी तक्रार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला होता. यानंतर प्रशासनाने कवठेमहांकाळच्या सहायक निबंधक कार्यालयास चौकशीची सूचना केली. सहायक निबंधक मोहिते यांनी मंगळवारी चार पथके नेमून लंगरपेठ येथील शिंदे याच्या राहत्या घराची व शेतातील घराची झडती घेतली. यावेळी दोन्ही घरांमध्ये सातबारा उतारे, फेरफार उतारे, काही मोकळे धनादेश मिळून आले. लक्ष्मण शिंदे फरार झाला आहे. पथकाने त्याला चौकशीसाठी हजर होण्यास बजावले आहे.
कारवाईत कवठेमहांकाळचे सहायक निबंधक बिपीन मोहिते यांच्यासह सांगलीच्या सहायक निबंधक उर्मिला राजमाने, तासगावचे सहायक निबंधक वैभव हजारे, पलूसचे सहायक निबंधक सचिन पाटणकर, मिरजेचे सहायक निबंधक संतोष बोगार व पोलीस सहभागी झाले होते. सकाळी नऊ वाजता सुरू झालेली कारवाई सायंकाळी साडेपाचपर्यंत सुरू होती.