शालेय पटसंख्येत चार हजाराने वाढ

By admin | Published: May 6, 2016 11:15 PM2016-05-06T23:15:52+5:302016-05-07T00:58:48+5:30

शिक्षण समिती सभा : शाळा इमारत बांधकाम व दुरुस्तीसाठी कोटीचा निधी

Four thousand increments in the school board | शालेय पटसंख्येत चार हजाराने वाढ

शालेय पटसंख्येत चार हजाराने वाढ

Next

सांगली : नवीन शैक्षणिक वर्षासाठी गुढीपाडव्यापासून सुरु झालेल्या शाळा प्रवेशात जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी समाधानकारक बातमी असून, जिल्ह्यात पटसंख्येत चार हजारने वाढ झाली आहे. शुक्रवारी जिल्हा परिषदेत झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत याबाबत माहिती देण्यात आली. दरम्यान, शाळा इमारतीच्या नवीन बांधकामासाठी ५० लाख, तर इमारत दुरुस्तीसाठी ५० लाख असा एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिली.
शिक्षण समितीच्या सभेत सुरुवातीला जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येत वाढ झाली असून जिल्ह्यात चार हजार नवीन विद्यार्थ्यांची नोंद झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर शिक्षण विभागाच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
जिल्हा नियोजन समितीकडून शाळा इमारत बांधकामासाठी ५० लाख, तर दुरुस्तीसाठी ५० लाख असा एक कोटीचा निधी प्राप्त झाल्यानंतर या निधीच्या विनियोगासाठी निवडण्यात आलेल्या शाळांच्या यादीला सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हापातळीवर घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्तीचा निकालही यावेळी जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचा निर्णय घेण्यात आला.
आयएसओ मानांकनाच्या धर्तीवर शासनाच्या समृध्द शाळा योजनेंतर्गत ‘शाळा सिध्दी २०१६’ मध्ये १३६ केंद्रांतून किमान एका शाळेला मानांकन मिळविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष रणजित पाटील, सुरेश मोहिते, मीनाक्षी महाडिक, गजानन कोठावळे, सुहास शिंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांच्यासह सर्व उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


सांगली : जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. संपूर्ण राज्यात अशी परीक्षा घेणारी ही एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे. दरम्यान, या परीक्षेचा चौथीचा निकाल ६८ टक्के, तर सातवीचा निकाल ७३ टक्के लागला आहे. लवकरच यशस्वी विद्यार्थ्यांना रोख बक्षीस, पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्वीय निधीच्या सहकार्यातून इयत्ता चौथी व इयत्ता सातवीसाठी जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. यात ४ थी परीक्षेसाठी २४ हजार ५३३ विद्यार्थी बसले होते. त्यातील १६ हजार ७७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ६८.३७ टक्के निकाल लागला आहे. तसेच ७ वी परीक्षेसाठी १० हजार ३४८ विद्यार्थी बसले होते. त्यातील ७ हजार ६२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सातवीचा ७३.७१ टक्के निकाल लागला आहे.
४ थी च्या परीक्षेत सर्वसाधारण गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी व शाळा पुढीलप्रमाणे : प्रथम : आसिया तारीश आत्तार ( वांडरेवस्ती शाळा), पृथ्वीराज प्रवीण पाटील (शाळा नं. १ कुची), शिवराज नवाळे (शाळा नं. १ दिघंची), सुजित देशमुख (शाळा नं. १ दिघंची), ऋतुजा पाटील (नागाव नि.), द्वितीय : समीक्षा धने (नेहरुनगर), यश झांबरे (बागमळा, डोंगरसोनी), तृतीय : विश्वजित बंडगर (सरस्वतीनगर), आदित्य कांबळे (वांडरेवस्ती), अथर्व कुडचे (इंगळे खोरा, मुळीक वस्ती), वनिता माळी (इंगळे खोरा, मुळीक वस्ती), विराज चव्हाण (य.पा.वाडी).
सातवी गुणवत्ता यादीतील विद्यार्थी पुढीलप्रमाणे : प्रथम : गायत्री पाटील (नेहरुनगर), द्वितीय : सोनाली पाटील (नागाव नि.), वैशाली पाटील (आरवडे), तृतीय : सानिका जगदाळे , प्राची पाटील (नेहरुनगर). या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष रणजित पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Four thousand increments in the school board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.