सांगली जिल्ह्यातील चार हजार एसटी कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत, न्यायालयाच्या आदेशाचेही पालन नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 11:52 AM2023-02-17T11:52:49+5:302023-02-17T11:53:16+5:30
बारा ते तेरा तास काम करूनही पगार मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी
सांगली : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या जिल्ह्यातील चार हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पगार गेल्या चार महिन्यांपासून वेळेवर होत नाहीत. त्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या महिन्यात देखील १६ तारीख आली तरी कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत. न्यायालयाने कर्मचाऱ्यांचे पगार १० तारखेच्या आत करण्याचे आदेश दिले आहेत. तरी देखील त्याचे पालन होत नाही. त्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस बजावली आहे.
आर्थिक अडचणीमुळे कवठेमहांकाळ आगारातील चालक भीमराव सूर्यवंशी यांनी बुधवारी आत्महत्या केली आहे. अशा घटनेनंतर तरी एसटी महामंडळ आणि शासनाला जाग येणार आहे का, असा सवाल संतप्त कामगारांनी बुधवारी केला. गेल्या चार महिन्यात एसटी कामगारांचे पगार वेळेवर होत नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दैनंदिन खर्च भागवितानाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बारा ते तेरा तास काम करूनही पगार मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. न्यायालयाने महिन्याच्या १० तारखेच्या आत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला पाहिजे, अशी सूचना शासन आणि एसटी महामंडळ प्रशासनाला दिला आहे. न्यायालयाच्या आदेशाचेही शासनाकडून पालन होत नसल्याबद्दल एसटी कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
म्हणूनच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांना महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने वेळेत पगार होण्याबाबत नोटीस बजावली आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचेही पालन झाले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.
कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत झालेच पाहिजे : अशोक खोत
एसटी महामंडळाचे कर्मचारी सध्या एसटी फायद्यात आणण्यासाठी बारा ते तेरा तास राबत आहेत. या कर्मचाऱ्यांना शासनाने वेळेवर पगार देऊन प्रोत्साहन दिले पाहिजे. पण, गेल्या तीन ते चार महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांचे पगारच वेळेवर होत नसल्यामुळे कर्मचारी आर्थिक अडचणीत आहेत. एसटी महामंडळाने तातडीने पगार देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत यांनी दिली.