सात दिवसात उचलला चार हजार टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:42 PM2019-08-18T23:42:33+5:302019-08-18T23:42:40+5:30

सांगली : शहरातील महापूर ओसरण्यास आठवडाभरापूर्वी सुरूवात झाली. त्यानंतर महापालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली. गेल्या सात दिवसात तब्बल चार ...

Four thousand tons of garbage picked up in seven days | सात दिवसात उचलला चार हजार टन कचरा

सात दिवसात उचलला चार हजार टन कचरा

Next

सांगली : शहरातील महापूर ओसरण्यास आठवडाभरापूर्वी सुरूवात झाली. त्यानंतर महापालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली. गेल्या सात दिवसात तब्बल चार हजारहून अधिक टन कचरा उचलला गेला आहे. अजूनही पूरबाधित परिसरात कचऱ्याचे ढीग आहेत. एकेका रस्त्यावर तीन-चारदा स्वच्छता करूनही कचºयाचे ढीग हटता हटेनात. त्यात स्वच्छतेसाठी हजारो हात मदतीला आल्याने काही प्रमाणात का होईना, महापालिकेला दिलासा मिळाला आहे.
महापुराच्या विळख्यात शहराचा ६० टक्के भाग सापडला होता. नागरी वस्तीसह व्यापार पेठेलाही पुराचा मोठा फटका बसला. सांगलीत कृष्णेने उच्चांकी ५८ फुटाची पातळी गाठली. त्यामुळे संपूर्ण जनजीवनावर पुराचा परिणाम झाला. गेल्या रविवारी पुराची पातळी स्थिर झाली, तर सोमवारपासून पूर ओसरण्यास सुरूवात झाली. पहिले दोन दिवस फूट-दोन फुटाने पातळी उतरली. त्यानंतर मात्र वेगाने पुराचे पाणी नदीपात्रात गेले.
पुराचे पाणी ओसरलेल्या भागाची महापालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेतली. महापालिकेच्या हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या मदतीला मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड या महापालिकांसह राज्यातील नगरपालिकांची यंत्रणाही धावली. संत निरंकारी मंडळ, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, जनकल्याण समिती, निर्धार फौंडेशन अशा कित्येक सामाजिक संघटनाही स्वच्छतेत सहभागी झाल्या आहेत. हजारो हात स्वच्छतेसाठी सरसावले असले तरी, पुराची व्याप्ती पाहता, स्वच्छतेचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. गेल्या काही दिवसांत वखारभाग, शंभरफुटी, पत्रकारनगर, गणेशनगर, मारुती रोड, हरभट रोड, सराफकट्टा, गणपती पेठ, कापडपेठ आदीसह विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. घरे, दुकानातील भिजलेला, कुजलेला कचरा रस्त्यावर पडला होता. तो उचलण्यात आला. एकेका रस्त्यावर दोन, तीनदा कचरा उचलला तरी, अजूनही कचºयाचे ढीग रस्त्यावर पडतच आहेत. हा सारा कचरा उचलण्यास अजून पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागेल. अजूनही काही पूरग्रस्त व्यापारी व नागरिकांकडून घरांची, दुकानांची स्वच्छता सुरू आहे. विशेषत: बेसमेंटमधील दुकानांच्या स्वच्छतेला आता कुठे सुरूवात झाली आहे. त्यामुळे कचरा रस्त्यावर येऊन पडत आहे. त्याचा ताण यंत्रणेवर येत आहे. गेल्या सात दिवसात चार हजार टनाहून अधिक कचरा उचलला गेला आहे. दररोजच्या कचरा उठावापेक्षा सहापटीने अधिक कचरा उचलला जात आहे.
मुंबईकरांना परतीचे वेध
मुंबई महापालिकेचे ३५० हून अधिक कर्मचारी व अधिकारी सफाईसाठी सांगलीत आले आहेत. त्यांच्यासोबत अत्याधुनिक यंत्रसामग्रीही आहे. मुंबईसोबतच पुणे, पिंपरी-चिंचवड व इतर महापालिकाही मदतीला धावल्या आहेत. गेले सात दिवस ते सांगलीत कचरा उठाव, स्वच्छता करीत आहेत. मुंबईच्या सफाई कामगारांना आता परतीचे वेध लागले आहेत. ते परत गेल्यानंतरच खºयाअर्थाने महापालिकेच्या यंत्रणेवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाला आपल्या यंत्रणेचे नियोजन करण्याची गरज आहे. अजून एक अथवा दोन दिवस मुंबईचे कर्मचारी सांगलीत राहतील, असे सांगण्यात येत आहे.

Web Title: Four thousand tons of garbage picked up in seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.