चार हजार बेशिस्त वाहनचालक जाळ्यात
By admin | Published: April 25, 2017 11:25 PM2017-04-25T23:25:10+5:302017-04-25T23:25:10+5:30
दुसऱ्यादिवशीही दणका : जिल्ह्यात नाकेबंदी; आठ लाखांचा दंड वसूल
सांगली : सांगली, मिरजेसह जिल्ह्यात दुसऱ्यादिवशीही पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांना कारवाईचा दणका दिला. जिल्ह्यात ७० ‘पार्इंट’वर केलेल्या नाकेबंदीच्या जाळ्यात ४ हजार ४२ वाहने सापडली. त्यांच्याकडून सुमारे सात लाख ८० हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी परिक्षेत्रात नाकेबंदी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनासाठी शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे व महामार्गावर, तसेच ग्रामीण भागातील मार्गावरील विविध चौक, पूल, बायपास रस्ते, महत्त्वाचे जंक्शन या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून नाकेबंदी केली जात आहे. सोमवारी व मंगळवारी सकाळी आठ ते अकरा व सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ या वेळेत नाकेबंदी लावण्यात आली होती. सोमवारी सकाळच्या सत्रात १ हजार ६८५ वाहनधारकांवर कारवाई करुन तीन लाख ७० हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला होता. मंगळवारी सकाळी ४ हजार ४२ वाहनधारकांना पकडून सात लाख ८० हजाराचा दंड वसूल केला. (प्रतिनिधी)
कारवाईच्या केसेसची संख्या
सेफ्टी बेल्ट : ९७६ केसेस
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे : ११९
वाहनास टिन्टेड ग्लास वापरणे : ५४
रिव्हर्स हॉर्नचा वापर करणे : ८
हॉकिंग हॉर्न : २
ट्रीपल सीट : २८३
लेन कटिंग : ७७
सिग्नल जंपिंग : ३४
दारूच्या नशेत वाहन चालविणे : ६
फॅन्सी नंबर प्लेट : ५६
विनापरवाना वाहन चालविणे : ५२१
बेकायदा प्रवासी वाहतूक : २५
एकूण : ४,०४२
एकूण दंड : ७ लाख ८० हजार रुपये
पाचशेहून पोलिस
जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्यासह ६ पोलिस उपअधीक्षक, ५ पोलिस निरीक्षक, २१ सहाय्यक पोलिस निरीक्षक, २२ उपनिरीक्षक, तसेच ४५२ पोलिस शिपाई नाकेबंदीच्या कारवाईत सहभागी झाले होते. यावेळी दारुच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तळीरामांची यंत्राद्वारे तपासणी करुन कारवाई करण्यात आली. सांगली, मिरजेसह जिल्ह्यात ७० पार्इंटवर नाकेबंदी सुरु होती. रात्री साडेआठपर्यंत ही कारवाई सुरु होती.