उपाध्यक्षांसह चार सभापती बिनविरोध
By admin | Published: April 13, 2016 10:33 PM2016-04-13T22:33:43+5:302016-04-13T23:22:49+5:30
जिल्हा परिषद : कॉँग्रेसची माघार; रणजित पाटील, संजीवकुमार सावंत, भाऊसाहेब पाटील, कुसूम मोटे, सुनंदा पाटील यांना संधी
सांगली : जिल्हा परिषद उपाध्यक्षांसह चार सभापतिपदांच्या निवडीसाठी काँग्रेसच्या सदस्यांचे प्रयत्न सुरू असताना, नेत्यांचे दूरध्वनी बंद असल्यामुळे अखेरच्या क्षणी अर्ज मागे घ्यावे लागले. परिणामी उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे रणजित पाटील (कामेरी, ता. वाळवा) आणि सभापतीपदी संजीवकुमार सावंत (बनाळी, ता. जत), भाऊसाहेब पाटील (कुची, ता. कवठेमहांकाळ), सुनंदा पाटील (दरीबडची, ता. जत), कुसूम मोटे (खरसुंडी, आटपाडी) यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी झाली.
जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये उपाध्यक्षांसह चार विषय समिती सभापतींची नावे निश्चित झाली होती. प्रत्येक इच्छुकाला तयारीला लागण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. बुधवारी सकाळी राष्ट्रवादीच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी सदस्यांची बैठक घेतली. यामध्ये उपाध्यक्षपदासाठी रणजित पाटील, समाजकल्याण सभापतिपदासाठी कुसूम मोटे, जगन्नाथ लोहार, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी सुनंदा पाटील, उर्वरित दोन विषय समिती सभापतिपदासाठी संजीवकुमार सावंत, भाऊसाहेब पाटील यांना अर्ज भरण्याची सूचना दिली. कवठेमहांकाळ तालुक्यातून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे समर्थक तानाजी यमगर यांचा पत्ता कट झाला. त्यांच्या जागेवर आर. आर. (आबा) पाटील समर्थक भाऊसाहेब पाटील यांचे नाव पुढे आले. जगन्नाथ लोहार यांनाही अर्ज मागे घेण्याची सूचना दिल्यामुळे तेही नाराज झाले. राष्ट्रवादीमधील नाराज सदस्यांच्या जिवावर काँग्रेसचे पक्षप्रतोद सुरेश मोहिते, सम्राट महाडिक, सुहास शिंदे, प्रकाश कांबळे, मीनाक्षी अक्की, पवित्रा बरगाले यांनी अर्ज दाखल केले. परंतु, काँग्रेसच्या मदतीला एकही नेता नसल्यामुळे त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. अखेरच्या क्षणी मोहितेंसह काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे उपाध्यक्षपदावर रणजित पाटील, समाजकल्याण समिती सभापतीपदी मोटे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सुनंदा पाटील, इतर चार विषय समिती सभापतीपदी संजीवकुमार सावंत, भाऊसाहेब पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिरजेचे प्रांताधिकारी सुभाष बोरकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण जाधव उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आताषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. (वार्ताहर)
नेत्यांचे पाठबळ मिळाले नाही : सुरेश मोहिते
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजांच्या मदतीने निश्चित काँग्रेसला यश मिळाले असते. पण, काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांकडून काहीच पाठबळ मिळाले नसल्यामुळे आम्हाला अर्ज माघार घ्यावे लागले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते सुरेश मोहिते यांनी दिली.
कामेरीत जल्लोष
कामेरी : सांगली जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी कामेरी (ता. वाळवा) गावचे माजी सरपंच रणजित जगदीश पाटील यांची निवड झाल्याचे वृत्त गावात पोहोचताच त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली. उपाध्यक्षपदी रणजित पाटील यांचीच निवड होणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. बुधवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले. पाटील यांचीच निवड होणार असल्याचे माहीत असल्याने समर्थकांनीही सकाळपासूनच त्यांच्या मिरवणुकीची तयारी केली होती. सायंकाळी ते गावात आल्यानंतर समर्थकांनी त्यांची ढोल-ताशांच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढली. (वार्ताहर)
प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न : रणजित पाटील
पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवून काम करण्यात येईल. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणार आहोत. दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अपूर्ण पाणी योजना, ग्रामीण आरोग्य व्यवस्था आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारून जिल्हा परिषदेची प्रतिमा राज्यात उंचावण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया नूतन उपाध्यक्ष रणजित पाटील यांनी व्यक्त केली.