मिरजेत कुत्र्याने चावा घेतल्याने चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:27 AM2020-12-31T04:27:33+5:302020-12-31T04:27:33+5:30
मिरजेतील ब्राह्मणपुरी येथील आशिष सुभाष गौराजे हा चार वर्षाचा बालक भावासोबत घराबाहेर खेळत असताना दहा दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्याने त्याचा ...
मिरजेतील ब्राह्मणपुरी येथील आशिष सुभाष गौराजे हा चार वर्षाचा बालक भावासोबत घराबाहेर खेळत असताना दहा दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्याने त्याचा चावा घेतला. कुत्र्याने डोक्याचा व हाताचा चावा घेतल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी आशिषचा मृत्यू झाला. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताकडे महापालिकेचे दुर्लक्ष व आशिषवर उपचारात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. संबंधित दोषीविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर आशिषला शासकीय रुग्णालयात इंजेक्शन देण्यात आले हाेते. त्या इंजेक्शनमुळेच त्याची प्रकृती बिघडल्याची त्याच्या पालकांनी तक्रार केली. एकूणच मिरजेत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात असून, कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. कुत्र्याच्या चाव्यामुळे बालकाचा बळी गेल्याने खळबळ उडाली आहे.
चाैकट
उपचारासाठी दीड लाख खर्च
मृत आशिष हा अंगणवाडीत शिकत होता. आशिषचे वडील हमाली करतात. गरिब परिस्थिती असतानाही सुभाष गाैराजे यांनी नातेवाईकांकडून पैसे घेऊन मुलाच्या उपचारासाठी दीड लाख रुपये खर्च केले. मात्र हे प्रयत्न अयशस्वी ठरले. आशिषच्या मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत होती.
फाेटाे : ३० आशिष गाैराजे