वडियेरायबाग येथील चार वर्षीय बालकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:12 AM2020-02-13T00:12:31+5:302020-02-13T00:12:49+5:30
कडेगाव : वडियेरायबाग (ता. कडेगाव) येथून गेल्या २२ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राजवर्धन परशुराम पवार या चार वर्षीय बालकाचा खून ...
कडेगाव : वडियेरायबाग (ता. कडेगाव) येथून गेल्या २२ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राजवर्धन परशुराम पवार या चार वर्षीय बालकाचा खून झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी मृत राजवर्धनची चुलती शुभांगी प्रदीप जाधव (वय २०) व खुनात सहाय करणारा शुभांगीचा मावसभाऊ शंकर वसंत नंदीवाले (रा. तडसर, ता. कडेगाव) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
वडियेरायबाग येथील मराठी शाळेजवळ नंदीवाले वस्ती आहे. या वस्तीवर पवार भावकीची घरे आहेत. यातील काहींनी आपले आडनाव बदलून जाधव करून
घेतले आहे. नात्याने चुलत भाऊ असलेले परशुराम पवार व प्रदीप जाधव यांची
घरे एकमेकांशेजारीच आहेत. काही दिवसांपूर्वी मृत राजवर्धनचे आजोबा बापू पवार यांनी आपल्या मालकीची जागा विकली. या व्यवहारातील अडीच लाख रुपये त्यांनी घरी ठेवले होते. हे पैसे काही दिवसांपूर्वी चोरीस गेले. शुभांगी अथवा वस्तीवरील कोणी तरी हे पैसे चोरल्याचा संशय पवार कुटुंबियांना होता. या चोरीचा आळ आपल्यावर घेतल्याच्या रागातूनच शुभांगीने माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य केले.
बापू पवार यांचा नातू व परशुराम पवार यांचा चार वर्षांचा मुलगा राजवर्धन हा २१ जानेवारीला सकाळी अचानक बेपत्ता झाला. शोधाशोध करूनही तो न सापडल्याने पवार कुटुंबियांनी, वडियेरायबाग येथील अंगणवाडीतून अज्ञाताने राजवर्धनचे अपहरण केल्याची तक्रार चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी गोपनीयरित्या तपास केला असता, राजवर्धनची चुलत चुलती असलेल्या शुभांगीवर संशय बळावला. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली.
चोरीचा आळ घेतल्यामुळे शुभांगी संतापली होती. २१ जानेवारीस सकाळी राजवर्धन अंगणवाडीत गेला. काही वेळाने तो घरी आल्यानंतर शुभांगीने पवार कुटुंबियांच्या नकळत त्याला आपल्या घरात नेले व रागाच्या भरात त्याच्या तोंडावर उशी दाबून त्याचा खून केला. यानंतर तडसर येथील तिचा मावसभाऊ शंकर नंदीवाले याला बोलावून घेतले. या दोघांनी हा मृतदेह एका सुटकेसमध्ये घालून हिंगणगाव खुर्द (ता. कडेगाव) येथील देस्कत वस्तीजवळ नेऊन वाळूसरा ओढ्याच्या पात्रात बंधाऱ्याजवळ टाकून दिला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांना ओढापात्रात बालकाची कवटी, हाडांचा सांगाडा, तसेच दफ्तर व कपडे सापडले.
---------
चोरीच्या संशयामुळे राग अनावर
राजवर्धनचे आजोबा बापू पवार यांना जमीन विक्रीतून अडीच लाख रुपये मिळाले होते. हे पैसे त्यांनी घरी ठेवले होते. हे पैसे ३ जानेवारी २०२० रोजी घरातून चोरीस गेले होते. या चोरीबाबत बापू पवार यांनी शुभांगी व शेजारील काही लोकांवर संशय व्यक्त केला होता. चोरीबाबत खरे-खोटे करण्यासाठी संबंधित सर्वजण विशाळगड येथे देवाला निघाले होते. वाटेतच त्यांना गावातून एका व्यक्तीचा फोन आला. त्याने चोरीला गेलेल्या रकमेपैकी दीड लाख रुपये घराच्या अंगणात वैरणीच्या खाली सापडल्याचे सांगितले. यानंतर सर्वजण पुढे न जाता गावी परतले. यानंतरही उर्वरित एक लाखाची रक्कम कोणी चोरली, याची कुजबूज सुरू हाती. बापू पवार वारंवार शुभांगीवर संशय व्यक्त करीत असल्याने, या रागातून तिने राजवर्धनचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांचा शिताफीने तपास
पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी अंकुश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचणी-वांगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी, पोलीस कर्मचारी पोपट पवार, अधिक वनवे, उदय देशमुख, अमर जंगम, आनंदा पवार, विशाल साळुंखे यांच्या खास पथकाने गोपनियरीत्या तपास केला. कोणतेही धागेदोरे नसताना शिताफीने तपास करून गुन्हा उलगडा करून दोन्ही संशयितांना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.