Sangli News: पालकांची एक चुक, अन् चार वर्षांच्या चिमुकलीचा गेला जीव; मिरजेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 11:45 AM2023-02-08T11:45:46+5:302023-02-08T11:46:06+5:30
चिमुकली झोपली असल्याने घराला कुलूप लावून बाहेर गेले. गडबडीत गॅलरीचा दरवाजा बंद करायला विसरले.
मिरज : मिरजेत झारीबाग येथे अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने यशवी नीलेश देशमाने या चार वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. यशवी ही डाॅ. नीलेश देशमाने यांची कन्या असून, देशमाने दाम्पत्य यशवीला घरात झोपवून बाहेर गेले असताना ही घटना घडली.
मिरजेतील क्ष-किरणतज्ज्ञ डाॅ. नीलेश देशमाने हे झारीबाग परिसरातील अपार्टमेंटमध्ये पाचव्या मजल्यावर राहतात. डाॅ. देशमाने यांना दोन कन्या आहेत. मोठी मुलगी आजारी आहे. सोमवारी रात्री तिला दवाखान्यात घेऊन जाताना लहान मुलगी यशवी झोपली असल्याने डाॅ. देशमाने घराला कुलूप लावून बाहेर गेले. मात्र, गडबडीत गॅलरीचा दरवाजा बंद करण्यास विसरले.
थोड्या वेळात जागी झालेली यशवी पालकांचा शोध घेत गॅलरीत गेली. तेथून इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. पालकांच्या एका चुकीमुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.