मद्यपी नराधम बापानेच चार वर्षांच्या बालिकेचा केला खून, सांगलीतील कुरळप येथील संतापजनक घटना
By अशोक डोंबाळे | Published: March 16, 2023 05:36 PM2023-03-16T17:36:33+5:302023-03-16T17:37:08+5:30
औषधोपचारास कंटाळून कृत्य केल्याची माहिती, विहिरीत टाकल्याची पोलिसांना दिली कबुली
सांगली : कुरळप (ता. वाळवा) येथील चार वर्षांच्या दिव्यांग मुलीच्या औषधोपचाराचा खर्च करूनही तिच्यात सुधारणा होत नसल्यामुळे मद्यपी बापानेच तिला विहिरीत ढकलून मारल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. श्रीदेवी कोळी असे मृत मुलीचे नाव असून, तिचा बाप अण्णाप्पा तुकाराम कोळी (वय २७) याला अटक केली आहे. अण्णाप्पाचे भाऊ भीमराव कोळी यांनी कुरळप पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अण्णाप्पा कोळी यांचे कुटुंब ‘पोतराज’चा व्यवसाय करीत असून, ते मागील १५ वर्षांपासून कुरळप येथे वास्तव्यास आहे. श्रीदेवी दिव्यांग होती. तिच्यावर कोळी कुटुंबीयांकडून औषधोपचार सुरू होते. मात्र, ती बरी होत नव्हती. यामुळे अण्णाप्पाला नैराश्य आले होते. तो मंगळवार, १४ मार्च रोजी रात्री दहाच्या दरम्यान दारू पिऊन घरी आला. यावेळी दारूच्या नशेतच घराजवळ असणाऱ्या मेतुगडे यांच्या विहिरीत त्याने झोपेत असलेल्या श्रीदेवीला फेकून दिले. घरी आल्यावर भाऊ भीमराव यांनी श्रीदेवीबाबत त्याला विचारले. यावर अण्णाप्पाने तिला विहिरीत टाकल्याचे सांगितले. भीमराव कोळी यांनी लगेच कुरळप पोलिसात फिर्याद दिली.
तिचा विहिरीत शोध घेतला. पण, पाण्यात बुडाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी अण्णाप्पा कोळीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला कुरळप पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली.
रात्रभर शोध, सकाळी मृतदेह सापडला
इस्लामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम, साहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव, अनिल पाटील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन रात्री दोनपर्यंत पाहणी केली. मात्र, विहिरीत पाणी जास्त असल्यामुळे श्रीदेवी दिसून आली नाही. विद्युत मोटारींनी रात्रभर पाणी उपसा केल्यानंतर सकाळी सात वाजता तिचा मृतदेह दिसून आला.
चुलत्याला शोक अनावर
चार वर्षांच्या श्रीदेवीचा मृतदेह विहिरीत उतरून चुलते भीमराव कोळी यांनी बाहेर काढला. यावेळी त्यांना शोक अनावर झाला होता. ते दृश्य मन हेलावून टाकणारे होते. बापाने चिमुकलीचा बळी घेतल्याच्या कृत्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.