Sangli Crime: कवठेमहांकाळमध्ये बनावट नोटा जप्त, कर्नाटकातील भामट्यास अटक; एकजण पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 11:21 AM2023-01-02T11:21:20+5:302023-01-02T12:01:35+5:30
एका बेकरीमध्ये बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न
शिरढोण : कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोरील जुना बसस्थानक चौकातील एका बेकरीमध्ये बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोपट धोंडीबा शेरखाने (वय २६, रा. नवलिहाळ, ता. अथणी) या भामट्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून १४ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या. हा प्रकार शनिवारी रात्री साडेनऊ वाजता घडला. कारवाईदरम्यान पोपट याचा भाऊ अशोक शेरखाने पसार झाला.
कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोरील जुन्या बसस्थानक परिसरातील एका बेकरीत पोपट व अशोक शेरखाने हे सख्ख्ये भाऊ खरेदीच्या बहाण्याने आले होते. काही वस्तू खरेदी करून त्यांनी दुकानदारास पैसे देऊ केले. यावेळी दुकानदारास या नोटा बनावट असल्याचे लक्षात आल्या. त्यांनी जुने बसस्थानक चौकातच कवठेमहांकाळ-जत रस्त्यावर वाहन तपासणीसाठी उभे असलेले पोलिस नाईक सचिन पाटील यांना बोलावून घेत नोटा बनावट असल्याचा संशय व्यक्त केला.
पोलिसांना पाहून पोपट व अशोक यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. सचिन पाटील यांनी पाठलाग करून पोपट शेरखाने यास ताब्यात घेतले, तर अशोक फरार होण्यात यशस्वी झाला. कवठेमहांकाळ पोलिसांनी शेरखाने याची तपासणी केली असता त्याच्याकडे १४ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या. त्यास अटक करून अशोक शेरखाने याच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले. अधिक तपास उपनिरीक्षक अक्षय ठिकाणे करीत आहेत.