चौदा शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू
By admin | Published: July 16, 2014 11:30 PM2014-07-16T23:30:13+5:302014-07-16T23:39:05+5:30
जि. प. ची मंजुरी : बैठकीत चर्चा
सांगली : जिल्हा परिषदेच्या चौदा शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरु करण्यास शिक्षण समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली़ कुची (ता़ कवठेमहांकाळ) येथील शाळेची जागा ग्रामपंचायतीला देण्याचा ठराव सदस्यांनी फेटाळला़ गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल दिल्यानंतर ग्रामपंचायतीला जागा देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे़ उपाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची बैठक झाली़ यावेळी आवंढी, लोहगाव , रेठरेधरण नं़ १, नरसिंहपूर, कवठेमहांकाळ, ढालेवाडी, इरळी, शिंदेवाडी, हिंगणगाव, माळेवस्ती, कवठेएकंद येथील शाळेत सेमी इंग्रजी सुरु करण्याचा सदस्यांनी ठराव मांडला़ त्यास सदस्यांनी सहमती दिली़ कुची येथील जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागेची ग्रामपंचायतीने मागणी केली होती़ तसा प्रस्ताव शिक्षण समितीसमोर आल्यानंतर सदस्य भाऊसाहेब पाटील यांनी विरोध केला़ शाळेची जागा मोक्याच्या ठिकाणी असून, ग्रामपंचायत देत असलेली शाळेची जागा ओढ्याच्या काठावर असल्यामुळे ती नको, अशी त्यांनी भूमिका मांडली़ त्यामुळे कुची येथील जागेचा ठराव फेटाळण्यात आला़ (प्रतिनिधी)