चौदा वर्षांच्या अर्जुनने यू-ट्यूब बघत बनवली कार; सांगलीत यशस्वी प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 09:59 AM2023-01-17T09:59:32+5:302023-01-17T09:59:45+5:30
सहा तास चार्जिंगनंतर ३० किलोमीटर धाव
सांगली : यू-ट्यूबवर माहिती घेत तब्बल सातवेळा वेगवेगळे प्रयोग करत सांगलीतील संजयनगरमधील अर्जुन महेश खरात या चौदा वर्षांच्या मुलाने टाकाऊ साहित्यापासून विजेवरील छोटी चारचाकी गाडी तयार केली आहे. सहा तास चार्जिंग केल्यावर ही चारचाकी ३० ते ३५ किलोमीटर धावते.
संजयनगरमधील महाराष्ट्र हाउसिंग सोसायटीत अर्जुन खरात कुटुंबासह राहतो. तो सध्या विश्रामबाग माध्यमिक विद्यालयात नववीत आहे. कोरोनामुळे २०२० मध्ये झालेल्या लॉकडाउनमध्ये मोबाइलवर यू-ट्यूबवर पाहून टाकाऊ साहित्यापासून चारचाकी गाडी तयार करण्यास त्याने सुरुवात केली. सातवेळा प्रयोग केले. अखेर सुमारे ५० हजार रुपये खर्च करून त्याने गाडी तयार केली. वडील महेश खरात व आजोबा रामराव खरात यांनी आर्थिक मदत केली.
..या साधनांचा केला वापर
अर्जुनने ही गाडी तयार करण्यासाठी ७२ व्होल्टची बॅटरी वापरली आहे. स्वतः डिझाइन करून लोखंडी चेस तयार केली. दुचाकीचे चार शॉक अब्सोर्बर तर मोटारीचे स्टेअरिंग वापरले आहे. दुचाकीची लहान चाके व डिस्को ब्रेकचाही वापर केला. दुचाकीची चेन व इंजिन तसेच इलेक्ट्रिकल कन्व्हेंशल किटचा उपयोग केला. तब्बल सात वेळा प्रयत्न करण्यात आले. अखेर २५ डिसेंबर २०२२ रोजी ही गाडी धावली.
कोरोनातील लॉकडाउनमध्ये यू-ट्यूब पाहून ही चारचाकी गाडी तयार करण्याची कल्पना सुचली. तेव्हापासून २०२२च्या अखेरपर्यंत सातत्याने यावर प्रयोग करत राहिलो आणि यशही मिळाले.- अर्जुन खरात