शंभराव्या नाट्यसंमेलनाचे पुन्हा चौघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:19 AM2021-01-01T04:19:05+5:302021-01-01T04:19:05+5:30

सांगली : शंभराव्या नाट्यसंमेलनासाठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीची बैठक मुंबईत १३ जानेवारीरोजी बोलाविण्यात आली आहे. संमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी या ...

Fourth of the 100th Natya Sammelan | शंभराव्या नाट्यसंमेलनाचे पुन्हा चौघडे

शंभराव्या नाट्यसंमेलनाचे पुन्हा चौघडे

googlenewsNext

सांगली : शंभराव्या नाट्यसंमेलनासाठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीची बैठक मुंबईत १३ जानेवारीरोजी बोलाविण्यात आली आहे. संमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी या बैठकीत मुहूर्त निश्चित केला जाण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षभरात कोरोना व लॉकडाऊनमुळे शंभरावे संमेलन होऊ शकले नाही. जानेवारीमध्ये त्याची पूर्वतयारी करण्यात आली होती. राज्यभरातील रंगकर्मी संमेलनात सहभागासाठी उत्सुक असतानाच कोरोनाचे संकट आल्याने संमेलन सुरू होण्यापूर्वीच पडदा पडला. राज्यभरात नाट्यगृहे बंद राहिल्याने संमेलनाचे शतक साजरे झालेच नाही.

याची रुखरुख लागून राहिलेल्या रंगकर्मींनी मुंबईत आपल्या परीने नाट्यसंमेलन घेतले. ८ डिसेंबररोजी दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रातील छोटेखानी संमेलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘माझे असेही एक संमेलन ... नाटककारांचे’ या संबोधनासह झालेले हे संमेलन साडेनव्याण्णववे म्हणून जाहीर केले गेले. कोरोनाचे दडपण झुगारुन तरुण रंगकर्मी सहभागी झाले. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते, तर कवी प्रवीण दवणे यांनी स्वागताध्यक्षाची जबाबदारी पार पाडली. या संमेलनामुळे शतकमहोत्सवाची तहान ताकावर भागली, पण आता शंभराव्या राज्यव्यापी संमेलनाची आस अधिकच लागून राहिली आहे. कोरोनाचा बहर ओसरल्याने नाट्यगृहे सुरू झाली असली, तरी उपस्थितीवर मर्यादा आहेत. अर्ध्या-अधिक भरलेल्या खुर्च्यांचे नाट्यगृह संयोजकांना परवडणारे नाही. शतकमहोत्सवी संमेलन राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या स्टाईलने साजरे होणार आहे. त्याचा खर्च काही कोटींच्या घरात आहे. शासनाने दहा कोटींचा आपला वाटा तयार ठेवला असला, तरी त्यासाठी संमेलनाचे वेळापत्रक निश्चित होणे आवश्यक आहे. यासंदर्भातील चर्चा १३ जानेवारीच्या बैठकीत होणार आहे.

चौकट

शंभरावे संमेलन नोव्हेंबरमध्येच?

कोरोना पूर्णपणे ओसरुन नाट्यगृहे भरण्यास किमान मार्च उजाडण्याची शक्यता आहे. त्यानंतर संमेलनाची पूर्वतयारी होऊन प्रत्यक्ष कार्यक्रमांना जून उजाडेल. तोपर्यंत पावसाळा सुरू होईल. हे पाहता शंभरावे संमेलन नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता रंगकर्मी व्यक्त करत आहेत.

--------

Web Title: Fourth of the 100th Natya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.